Footpath Encroachment Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Footpath Encroachment: पिंपरी-चिंचवडमध्ये पदपथ गायब; अतिक्रमण, पार्किंग अन् दुचाकींच्या वर्दळीने पादचारी त्रस्त

दुकानदारांकडून व्यवसायासाठी वापर, वाहनचालकांकडून पदपथावरून वाहतूक; ‘पादचाऱ्यांनी चालायचे तरी कुठून?’

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहराच्या रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत असताना पादचाऱ्यांसाठी असलेले पदपथ मात्र, दिवसेंदिवस गायब होत चालल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळत आहे. एका बाजूला व्यावसायिकांकडून पदपथाचा व्यवसायासाठी तसेच पार्किंगसाठी वापर केला जात आहे, तर, दुसऱ्या बाजूला दुचाकीस्वारांकडून थेट पदपथावरून वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे अखेर पादचाऱ्यांनी चालायचे तरी कुठून?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पदपथ नागरिकांसाठी मोकळे असणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात दुकानांचे फलक, साहित्य, विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू, पार्किंग आणि विविध व्यावसायिक वापरामुळे पदपथाचा मोठा भाग व्यापलेला दिसतो. काही ठिकाणी तर पदपथ आणि दुकान यांच्यातील सीमारेषाच उरलेली नाही. यात भर पडते ती दुचाकीस्वारांच्या पदपथावरील वाहतुकीची. सिग्नलवर वाहतूककोंडी झाली की काही दुचाकीस्वार थेट पदपथाचा मार्ग पकडतात. पादचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या जागेतून वाहने सुसाट जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून बाजूला व्हावे लागते.

ग्राहकांच्या पार्किंगचा भारही पादचाऱ्यांच्या वाट्याला

व्यावसायिक आस्थापनांमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यास त्याचा थेट परिणाम रस्त्यावर होतो. दुकानात किंवा व्यावसायिक ठिकाणी आलेल्या ग्राहकांना पार्किंगची जागा मिळेपर्यंत रस्त्यावर वाहनांसह थांबावे लागते. परिणामी रस्त्याच्याकडेला वाहने उभी राहतात आणि उपलब्ध असलेला पदपथही अडवला जातो. काही ठिकाणी ग्राहकांची वाहने, व्यावसायिकांचे साहित्य आणि दुचाकीस्वारांची वर्दळ यामुळे पदपथ पादचाऱ्यांसाठी नसून इतरांच्या सोयीसाठीच राखीव असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.

परवानगी देताना पार्किंग आणि पादचारी मार्गाचा विचार होतो का?

एखाद्या ठिकाणी व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यास परवानगी देताना त्या ठिकाणी उपलब्ध पार्किंग, रस्त्याची रूंदी, पादचाऱ्यांसाठीची जागा आणि वाहतुकीवर होणारा परिणाम यांचा गांभीर्याने विचार केला जातो का?, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. विशेषतः प्रमुख रस्ते, महामार्गालगतची व्यावसायिक आस्थापने किंवा सिग्नल परिसरात परिस्थिती अधिक गंभीर आहे. रस्त्याच्याकडेला जागा कमी आणि त्यातच पदपथावर अतिक्रमण असेल, तर पादचाऱ्यांनी सुरक्षितपणे मार्गक्रमण करायचे तरी कसे?

पदपथावर अतिक्रमण; कारवाई कुणावर?

सर्वांत गंभीर बाब म्हणजे ज्या महापालिका प्रशासनावर शहरातील अतिक्रमणे हटविणे, पदपथ मोकळे ठेवणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे, त्याच प्रशासनाच्या हद्दीत अनेक ठिकाणी पदपथावर अतिक्रमणाचे चित्र कायम आहे. अतिक्रमणाविरोधात अधूनमधून कारवाई होते. मात्र, काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी पूर्वीचीच परिस्थिती निर्माण होत असल्याने कारवाई होतेय की केवळ कारवाईचा दिखावा? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शहरातील पदपथांवर व्यावसायिकांकडून तसेच वाहनचालकांकडून होणाऱ्या अतिक्रमणांबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी संबंधित ठिकाणांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. पदपथ मोकळे ठेवण्याबाबतही संबंधित व्यावसायिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
अतुल पाटील, विभाग प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन, महापालिका
शहराचा विकास केवळ रूंद रस्ते, उड्डाण पूल आणि सिग्नल व्यवस्थेपुरता मर्यादित न राहता पादचाऱ्यांना सुरक्षित आणि अडथळामुक्त चालण्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे पदपथ मोकळे करण्यासाठी ठोस मोहीम, व्यावसायिक आस्थापनांच्या पार्किंग व्यवस्थेची तपासणी आणि पदपथावरून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
आनंद बाराथे, ज्येष्ठ नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT