Fire Brigade Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Fire Department: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागात २१३ पदे रिक्त; १८ पैकी केवळ १० केंद्रे सुरू

लोकसंख्या ३० लाखांवर; घटनास्थळी पोहोचण्यास सात-आठ मिनिटांचा विलंब, मनुष्यबळाच्या कमतरतेचा फटका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: शहरात कोठेही आग लागली तसेच, इतर दुर्घटना घडल्यास अग्निशामक दलाला सतत दक्ष रहावे लागते. मात्र, अग्निशमन केंद्रांची मर्यादित संख्या आणि अपुर्‍या मनुष्यबळामुळे आपत्कालीन घटनांना सामोरे जाताना अग्निशमन विभागाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अग्निशमन विभागातील 213 रिक्त पदांची तातडीने भरती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. तसेच, शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार 18 पैकी केवळ दहा अग्निशमन केंद्र सुरू आहेत. घटनास्थळी पोहचण्यास पाच मिनिटाऐवजी सात ते आठ मिनिटे लागत आहेत.

शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांपुढे आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. चारी बाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने औद्योगिक तसेच, आयटी कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन घटनांची सातत्याने वाढ होत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात आगीच्या 1 हजार तर, इतर 1 हजार अशा दोन हजार आपत्कालीन घटना घडल्या आहेत.

अग्निशमन विभाग हा फक्त आगीवर नियंत्रण मिळविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, त्याची सरकारने सन 2023 मध्ये व्याप्ती वाढवून अग्निशमन व आपत्कालीन सेवा असे केले आहे. नागरिकांच्या जिविताला, मालमत्तांना धोका, अशा सर्व कॉल्सना प्रतिसाद द्यावा लागत आहे. लोकसंख्येच्या नियमाप्रमाणे शहरामध्ये 18 अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात 10 केंद्रे सुरू आहेत. शहरी भागात घटना घडल्यानंतर पाच मिनिटांत अग्निशमन पथकाने पोहचणे अपेक्षित असते. महापालिकेच्या अग्निशमन विभाग 7 ते 8 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहचत आहे. विलंबासाठी वाहतकू कोंडीसह केंद्राची कमी असलेली संख्या व मनुष्यबळाचा अभाव कारणीभूत ठरत आहे.

नागरिकांची जीवित व वित्तहानी वाचविण्याचे जोखमीचे कामकाज अग्निशामक विभागामार्फत 24 तास 7 दिवस केले जाते. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. सध्या विविध पदांवर 232 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. भविष्यात गांधीनगर, पिंपरी येथील मध्यवर्ती केंद्रासह 8 केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज लागणार आहे.

मंजूर जागा 445, रिक्त जागा 213

महापालिकेने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार अग्निशमन विभागात चारही वर्गातील 445 जागा मंजूर आहेत. मात्र, सध्यस्थितीत यामधील 232 जागांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी 1, उपमुख्य अग्निशमन अधिकारी 1, विभागीय अधिकारी 2, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी 2, अग्निशमन केंद्र अधिकारी 12 अशा महत्वाच्या 18 रिक्त आहेत. वास्तविक या जागा पदोन्नतीने भरणे अपेक्षित आहे. मात्र, पदोन्नतीसाठी निकष पूर्ण करणारे अधिकारी महापालिकेकडे नसल्याने सरळ सेवेने पदे भरणे अपेक्षित आहे. या महत्वाच्या जागांसह उपअग्निशमन अधिकारी 18, यंत्रचालक 48, लिडिंग फायरमन 11, फायरमन 108, वाहनचालक 11 अशा 213 जागा रिक्त आहेत, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली.

आयुक्तांच्या मान्यतेने भरतीप्रकिया राबवली जाईल

मतदार पडताळणी मोहीम (एसआयआर) संपल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागातील पदांच्या रिक्त जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार भरतीप्रक्रिया राबविली जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.

चार केंद्रांसाठी जागांचा शोध सुरू

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येनुसार 18 अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे. सध्यस्थितीत 10 अग्निशमन केंद्र कार्यान्वित असून, येत्या वर्षभरात नव्याने पुनावळे, प्राधिकरण व दिघी हे तीन सुरू होतील. पिंपरीतील मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालयाचे काम सुरू आहे. हे मुख्यालयाचे काम दीड ते दोन वर्षात पूर्ण होईल. त्यानंतर 14 केंद्र होतील. उर्वरित 4 केंद्रांसाठी जागेचा शोध सुरू आहे, असे अग्निशमन विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT