पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली येथील कुदळवाडी व पवारवस्ती परिसरात पुन्हा अतिक्रमण विरोधी कारवाई करीत दहा प्रार्थनास्थळे पाडली. महापालिकेने ही कारवाई मंगळवारी (दि. ९) पहाटे तीनच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात केली.
महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने क आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाच्या सहकार्याने अनधिकृत तसेच, महापालिका व खासगी जागेतील प्रार्थनास्थळांवर कारवाई केली. कारवाईसाठी प्रमुख रस्ते बंद करण्यात आले होते. या वेळी बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील भागवानी, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, अतुल पाटील, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व क्षेत्रिय अधिकारी, कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, बीट निरिक्षक व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान 22 पोकलेन, 26 जेसीबी आणि 120 मजुरांच्या सहाय्याने ही बांधकामे हटवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी 4 अग्निशमन वाहने व 2 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, पहाटेच्या वेळेस अचानक कारवाई सुरू केल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला. काही जमावाने पथकावर दगडफेक केली. त्यात महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी जखमी झाले नसल्याचे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
लवकरच सोळा धार्मिक स्थळांवर कारवाई
महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने गेल्या वर्षी कुदळवाडी परिसरातील एकूण 31 अनधिकृत धार्मिकस्थळांना नोटिसा बजावल्या होत्या. आतापर्यंत त्यांपैकी 15 धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित 16 धार्मिकस्थळांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे बांधकाम परवानगी विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
शहरातील अनधिकृत बांधकामे महापालिका पाडणारच: आयुक्त
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून अभय दिले जाणार नाही. शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता व कायद्याचे पालन अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनीही बांधकाम करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम सुरू करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
एकाच भागात वारंवार कारवाई होत असल्याने संताप
कुदळवाडी परिसरात अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, गोदामे, भंगार डेपो, अनधिकृत व्यावसायिक वापर, लघुउद्योग आदींमुळे चर्चेत आहे. या भागात फेब्रुवारी 2025 तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी सलग सात दिवस धडक कारवाई केली. त्यात 4 हजार 500 पेक्षा अधिक भंगार गोदाम, दुकाने, लघुउद्योग व घरांवर बुलडोझर फिरवत तब्बल 825 एकर जागा रिकामी करण्यात आली. या कारवाईमुळे हजारो लघुउद्योजक, व्यावसायिक व कामगार बेरोजगार झाले. त्यानंतर 11 मे रोजी तेथील चार प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी (दि.9) पुन्हा कारवाई करण्यात आली. त्यात एकूण 10 अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्यात आले. राजकीय दबावापोटी सातत्याने एकाच भागात महापालिका प्रशासनाकडून वारंवार कारवाई होत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अनधिकृत बांधकाम हटवून नागरी सुविधा निर्माण करणार
सर्व जाती-धर्माच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवून, तेथे तात्काळ सीमाभिंत टाकली जाणार आहे. तेथे नागरी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.