E RTS Electric Bus Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad E RTS Electric Bus: पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोला पर्याय? बीआरटी मार्गावर धावणार ई-आरटीएस इलेक्ट्रिक बस

मोशी ते वाकड १७ किमी मार्गावर पहिला टप्पा; पीएमपीएलपेक्षा महाग पण मेट्रोपेक्षा स्वस्त तिकीट, एका बसमधून २४० प्रवाशांची क्षमता

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बीआरटीएस मार्गावर परदेशाप्रमाणे इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टिम (ई-आरटीएस) अर्थात ईलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीएल बसपेक्षा थोडे अधिक आणि मेट्रोपेक्षा कमी असे त्याचे तिकीटदर असणार आहे. त्या बसेस बीआरटीच्या सर्व थांब्यांवर थांबणार असून, त्यांच्या फेर्‍याची वारंवारता अधिक असणार आहे. हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असून, नागरिकांना मेट्रोप्रमाणे दर्जेदार व वेगवान सेवा मिळेल, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. मात्र, पुण्यातील बीआरटीप्रमाणे या नव्या संकल्पनेची अवस्था होऊ नये, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

शहरात वेगवेगळ्या पाच रस्त्यांवर एकूण ६० किलोमीटर अंतराचा बीआरटी मार्ग आहे. मात्र, पीएमपीएलकडून आवश्यकतेनुसार बस पुरवल्या जात नसल्याने, फेर्‍यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांनी बीआरटीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, तब्बल ६०० कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप महापालिका व पीएमपीएलवर केला जात आहे. त्याला पर्याय म्हणून प्रगत देशात मोठा प्रतिसाद असलेली आणि कमी खर्चाची ई- आरटीएस ही नवीन प्रवासी वाहतूक व्यवस्था समोर आली आहे. त्यासाठी मेट्रोच्या तुलनेत खूपच कमी खर्च असून, पहिल्या टप्प्यात मोशी ते वाकड अशी १७ किलोमीटर धावणार आहे.

पीएमपीएलच्या धर्तीवर खासगी कंपनी नेमण्यात येणार आहे. त्याचा डीपीआर महामेट्रो तीन महिन्यांत बनवणार आहे. प्रकल्पास राज्य व केंद्र शासनाची मान्यता घेण्यात येईल. हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याची निविदा प्रसिद्ध करून देश-विदेशातील कंपन्यांकडून दर प्रस्ताव मागवण्यात येणार आहे. महापालिकेकडून पात्र कंपनीस मान्यता दिल्यानंतर प्रथम दीड ते दोन वर्षांसाठी करारनामा केला जाईल. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मुदतवाढ देऊन, इतर बीआरटी मार्गावरही तो प्रकल्प राबवण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

अंतर्गत रिंगरोडवरही ई-बसचा पर्याय

पिंपरी-चिंचवड शहरातील ३१.४० किलाेमीटर अंतराच्या अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) अर्थात उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार, रिंगरोडसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्या मार्गावर बीआरटी, मेट्रो किंवा ई-आरटीएस तयार करण्याचा पर्यायावर अभ्यास केला जात आहे. सोईस्कर प्रकल्प रिंग रोडवर राबवला जाणार आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, वेंगसकर क्रिकेट अकादमी, संचेती स्कूल, क्रांतीवीर नगर, थेरगाव, बिर्ला रुग्णालय, वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, निसर्ग दर्शन सोसायटी, निगडीतील भक्ती-शक्ती चौक, स्पाइन रस्ता, त्रिवेणीनगर, रुपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनी (मर्सिडीज बेंझ), इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर चौक, टेल्को रस्ता, लांडेवाडी असा रिंगरोडचा मार्ग आहे.

बीआरटीसाठी ६०० कोटींचा खर्च

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात दापोडी ते निगडी, नाशिक फाटा ते वाकड, सांगवी फाटा ते किवळे, निगडी ते किवळे, आणि चिखली ते काळेवाडी फाटा असे पाच बीआरटी मार्ग तयार केले आहे. त्याचे अंतर एकूण ६० किलोमीटर आहे. त्यातील ४५ किलोमीटर अंतराचे मार्ग केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम निधीतून सन २०१५ पर्यंत करण्यात आले आहेत. तर, त्यानंतर महापालिकेच्या निधीतून १५ किलोमीटर अंतराचा मार्ग तयार करण्यात आला. या मार्गासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. आता त्या मार्गावर नव्या ईटीआरएस सुरू केली जात असल्याने बीआरटीचा मूळ हेतू असफल झाल्याचा आरोप होत आहे.

तीन महामार्ग जोडले जाणार

पहिल्या टप्प्यात १७ किलोमीटर अंतर रस्त्यावर प्रकल्प राबवला जात आहे. बोर्‍हाडेवाडी, मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राशेजारी डेपोतून ही बस निघून स्पाईन रस्त्याने कुदळवाडी चौकात (बैलगाडी-कार शिल्प) येईल. तेथून बीआरटी मार्गाने आयुक्त बंगला, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर, मदर टेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी फाटापर्यंत जाईल. तेथून उजवीकडे वळण घेऊन रहाटणीहून जगताप डेअरी चौका जाऊन, पुन्हा उजवीकडे वळून सावित्रीबाई फुले उद्यान, कस्पटे चौकातून उजवीकडे वळून वाकड चौकापर्यंत जाईल. ती बस तीन बीआरटी मार्गातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई जुना महामार्ग, मुंबई-बंगळुरू महामार्ग जोडला जाणार आहे.

इलेक्ट्रिक बसमध्ये एका वेळी बसू शकतात २४० प्रवासी

ब्रिस्बेन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रीया आदी देशात या इलेक्ट्रिक बसची सुविधा आहे. तसेच, देशात बेळगाव, हुबळी, धारवाड, विशाखापट्टनम आदी शहरात ई-आरटीएस प्रकल्प तयार केला जात आहे. या इलेक्ट्रिक बसमधून एकावेळी २४० प्रवासी प्रवास करू शकतात. ती तीन डब्यांची बस असून, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन, ती बससेवा २४ तास दिली जाऊ शकेल. ती बस डेपोतील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनवर चार्ज होणार आहे. त्यानंतर ज्या थांब्यांवर ती थांबेल, तेथे बस चार्ज होईल. त्यामुळे बसमध्येच कोठे बंद पडणार नाही, असा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

वर्षभरात रस्त्यावर धावणार इलेक्ट्रिक बस

पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र ते वाकड चौक अशी १७ किलोमीटर अंतरावर ती इलेक्ट्रिक बस धावेल. महामेट्रोकडून तीन महिन्यांत ई-आरटीएसचा डीपीआर तयार करून मिळणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र सरकारचच्या मान्यतेनंतर तीन महिन्यांत निविदा काढून दर प्रस्ताव मागवले जातील. पात्र कंपनीस काम दिल्यानंतर त्यांना बसेस व यंत्रसामग्री आणण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी जाईल. बसच्या चाचण्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूकसेवा सुरू होईल. त्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागू शकतो. बीआरटी मार्गावर त्या बस थांबण्यासाठी केवळ ६ इंच उंचीचा पदपथ करावा लागणार आहे. वीज पुरवठा, बस, त्याची देखभाल व दुरुस्ती, चालक आदी सर्व खर्च संबंधित कंपनी करणार आहे, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT