पिंपरी: विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. २०) पिंपरी-चिंचवड शहरासह पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मिरवणुका, रावणदहन, पथसंचलन आणि शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शहरात विविध मंडळांच्या तब्बल २१८ मिरवणुका निघणार असून, २४ ठिकाणी रावणदहनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या चारही परिमंडळांत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये परिमंडळ चारमध्ये सर्वाधिक ६८ मिरवणुका निघणार आहेत. त्याखालोखाल परिमंडळ तीनमध्ये ५८, परिमंडळ एकमध्ये ५१ आणि परिमंडळ दोनमध्ये ४१ मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकांमध्ये विविध सार्वजनिक मंडळे आणि नागरिक सहभागी होणार आहेत.
विजयादशमीचे प्रमुख आकर्षण असलेल्या रावणदहनाचे २४ कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये परिमंडळ एकमध्ये सर्वाधिक ११, परिमंडळ तीनमध्ये नऊ, परिमंडळ दोनमध्ये तीन, तर परिमंडळ चारमध्ये एका ठिकाणी रावणदहन होणार आहे. या कार्यक्रमांना नागरिकांची मोठी उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मिरवणुकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३४ पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, १३ ठिकाणी शस्त्रपूजनाचे कार्यक्रम होणार असून, विविध भागांत दुर्गादौडही काढण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसभर शहरात उत्सवी वातावरण राहणार आहे. मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह वाहतुकीचे नियोजन करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. नागरिकांनी उत्सव शांततेत साजरा करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिमंडळ चारमध्ये सर्वाधिक मिरवणुका
विजयादशमीच्या मिरवणुकांमध्ये परिमंडळ चार आघाडीवर आहे. या परिमंडळात ६८ मिरवणुका होणार आहेत. त्यानंतर परिमंडळ तीनमध्ये ५८, परिमंडळ एकमध्ये ५१ आणि परिमंडळ दोनमध्ये ४१ मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे मिरवणुकांच्या मार्गांवर गर्दीचे नियोजन आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे.