Drowning Farmer Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Drowning Deaths: पिंपरी-चिंचवडमध्ये 5 महिन्यांत बुडून 50 जणांचा मृत्यू; पोलिसांकडून जलसाठ्यांची तपासणी सुरू

धोकादायक ठिकाणांची यादी तयार करण्याचे आदेश; नदी, धरणे आणि तलाव परिसरात सुरक्षा उपाययोजना कडक होणार

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पाच महिन्यांत पोहण्यासाठी, पर्यटनासाठी अथवा पाण्याजवळ फिरण्यासाठी गेलेल्या तब्बल 50 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील धोकादायक जलसाठे, नदीपात्रे, धरणे, तलाव, बंधारे आणि ओढ्यांची पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. भविष्यातील दुर्घटना रोखण्यासाठी पोलिस, महसूल आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

निष्काळजीपणा ठरतोय जीवघेणा

पाण्यातील बहुतांश दुर्घटना या निष्काळजीपणामुळे घडत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. मित्रांच्या आग््राहाखातर खोल पाण्यात उतरणे, मद्यप्राशन करून पोहणे, धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, लाइफ जॅकेटचा वापर न करणे आणि सेल्फीचा मोह ही दुर्घटनांमागील प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. अनेकदा एखादी व्यक्ती बुडू लागल्यानंतर तिला वाचवण्यासाठी इतर मित्र पाण्यात उतरतात आणि त्यांनाही जीव गमवावा लागत आहे.

सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव

पोलिस आयुक्तालयातील मावळ, देहूरोड, तळेगाव, कासारसाई, चाकण आणि परिसरातील धरणे, तलाव, बंधारे तसेच नदीकाठ ही ठिकाणे तरुणाईसाठी आकर्षणाची केंद्रे बनली आहेत. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने युवक या ठिकाणी पोहण्यासाठी अथवा सहलीसाठी जातात. मात्र, पाण्याची खोली, वेगवान प्रवाह, गाळ, अचानक निर्माण होणारे भोवरे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अनेक तरुण हुल्लडबाजी करत असल्याचेही समोर आले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षात विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये 50 जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण, अल्पवयीन मुले तसेच काही प्रौढांचाही समावेश आहे. अनेकांना पोहता येत नसतानाही ते खोल पाण्यात उतरल्याचे, तर काही प्रकरणांमध्ये सेल्फी काढताना किंवा मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात दुर्घटना घडल्याचे तपासात आढळून आले आहे.

सर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना

आयुक्तालयाच्या प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील अपघातप्रवण ठिकाणांची यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्या ठिकाणी सर्वाधिक दुर्घटना घडल्या, कोणत्या कालावधीत घटनांचे प्रमाण वाढते, तेथे चेतावणी फलक आहेत का, सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे का, याचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी प्रशासन सतर्क

पावसाळा तोंडावर आल्याने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. पावसाळ्यात धबधबे, ओढे, नदीपात्रे आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढते. त्याचवेळी अचानक पाण्याचा विसर्ग, वाढलेला प्रवाह आणि घसरडी ठिकाणे यामुळे वाहून जाण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे उन्हाळ्यातील बुडण्याच्या घटनांसह पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांचाही विचार करून व्यापक नियोजन करण्यात येत आहे.

धोकादायक ठिकाणी विशेष लक्ष

पोलिसांकडून काही ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त, धोक्याचे फलक, लोखंडी बॅरिकेड्‌‍स, सीसीटीव्ही व्यवस्था तसेच जनजागृती मोहिम राबविण्याचा विचार सुरू आहे. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि पावसाळ्यात गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

  • अपरिचित अथवा खोल पाण्यात उतरणे टाळावे

  • मद्यप्राशन करून पोहण्यासाठी जाऊ नये

  • धोक्याचे फलक आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे

  • पावसाळ्यात नदी, ओढे, धबधबे आणि धरण परिसरात विशेष खबरदारी घ्यावी

  • पोहता येत नसल्यास पाण्याजवळ जाणे टाळावे

  • अल्पवयीन मुलांवर पालकांनी सतत लक्ष ठेवावे

  • सेल्फी किंवा व्हिडिओच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नये

  • दुर्घटना घडल्यास स्वतः पाण्यात उडी न मारता तातडीने मदत मागवावी

पाण्यात बुडून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत असल्याने आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील धोकादायक जलसाठे आणि अपघातप्रवण ठिकाणांची माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त अहवालाच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती आणि आवश्यक तेथे बंदोबस्ताची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांनीही धोकादायक ठिकाणी जाणे टाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT