Drainage Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Drainage Encroachment:पिंपरी-चिंचवडमध्ये नाले अतिक्रमणामुळे पूरधोका कायम; सर्वेक्षणावर लाखो खर्च, पण कारवाई ठप्प

नैसर्गिक नाले-ओढे अतिक्रमणमुक्त करण्यात अपयश; पावसाळ्यात शहरातील अनेक भागांत पाणी तुंबण्याचा धोका वाढला

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दोन वर्षांपूर्वी संपूर्ण शहरातील नैसर्गिक नाले आणि ओढ्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, अद्याप एकही नाला पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही शहरात विविध ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका कायम आहे.

पावसाळ्यात दरवर्षी शहरातील अनेक भागांत पाणी तुंबत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये सुधारणा होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यातही शहरवासीयांनी ती स्थिती अनुभवली. घरे, हाऊसिंग सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे मोठे वित्तीय नुकसान होऊन वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक बेजार झाले होते.

दरम्यान, महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने दोन वर्षांपूर्वी शहरातील नैसर्गिक नाले व ओढ्याचे सर्वेक्षण केले होते. उघडी गटारे, स्टॉर्म वॉटर, ड्रेनेज, नैसर्गिक नाले, ओढे, रस्ते व रेल्वे मार्गावरील छोटे-मोठे सी. डी. वर्क या भागावर अतिक्रमण करून ते थेट बूजवून टाकल्याचे आढळून आले. अनेक नैसर्गिक नाले व ओढे बुजविल्याचे समोर आले. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. त्या काळात ड्रेनेजलाईन, स्टॉर्म वॉटर लाईन कुचकामी ठरत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

त्यावर उपाय म्हणून तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी पहिल्या टप्प्यात शहरातील आठ नाले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण झालेले नाले व ओढे नैसर्गिक स्वरूपात आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. अनेकांना नोटिसा बजावण्यात आला. एमआयडीसी भागांतील नाल्यांवरील अतिक्रमण हटण्याचे प्रयत्न झाले. मात्र, कारवाई केवळ जुजबी असून, अद्याप एकही नाला पूर्णपणे अतिक्रमणमुक्त झालेला नाही. परिणामी, पावसाळ्यात पुन्हा तुंबण्याचा धोका निर्माण कायम आहे.

नाले, ओढ्याचे जुने नकाशे गायब ?

शहरात महापालिका तसेच, एमआयडीसी, पीएमआरडीए, जुने प्राधिकरण तसेच, विविध शासकीय विभागांच्या जमिनी आहेत. बांधकामांसाठी बांधकाम परवानगी देण्याचा नियम प्रत्येक विभागांकडे वेगवेगळा आहे. शहराचे जुने नकाशे उपलब्ध होत नाहीत. पूर्वी नैसर्गिक नाल्याचा मार्ग कसा होता. त्याचे पात्र किती रूंद होते, तो काढून कसा, कोणत्या दिशेला वळला, मार्ग कसा बदलला आदींची माहिती जुने नकाशे उपलब्ध होत नसल्याने समोर येत नाही. नाले व ओढ्याचा नकाशा उपलब्ध होत नसल्याने काही भागांत कारवाईस अडथळे येत आहेत, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ज्या भागांत पाणी साचते, तेथे प्राधान्याने कारवाई केली जात असल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याची तळी

जोरदार पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक भागात पाणी तुंबते. भूमकर चौक, पुनावळे, ताथवडे, वाकड नाका, जगदंबा हॉटेल, निगडीतील टिळक चौक, आकुर्डीतील खंडोबा माळ, बजाज ऑटो गेटसमोर, हॉटेल क्लाऊड नाईनसमोर, बौद्ध नगर, भाट नगर, रमाबाई नगर, आंबेडकर कॉलनी, काळेवाडी, साई चौक, औंधहून सांगवीकडे जाणारा भुयारी मार्ग, सांगवी वाहतूक विभाग, वाकड, मानकर चौक, कस्पटे कॉर्नर, हॉटेल सयाजी, सुर्या भुयारी मार्ग, वल्लभनगर, पुणे-मुंबई जुना महामार्ग ग्रेसेपरेटर, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, ज्युपिटर रुग्णालयाकडे जाणारा पूल, फुगेवाडी, दापोडी, भोसरीतील पीसीएमटी चौक, नाशिक फाटा चौक, चिखलीतील घरकुल, किवळे अंडरपास, सिंबायोसिस महाविद्यालय अंडरपास, चिंचवडमधील लोकमान्य रुग्णालय, निगडी उड्डाण पूल, खराळवाडी गावठाण, मोशी चौक, डांगे चौक अंडरपास आदी भागांत पावसाचे पाणी तुंबते. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

डोळेझाक केल्याने नाले गायब

पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभी होत आहेत. पाच ते सहा मजली प्रशस्त इमारती दाटीवाटीने अवघ्या तीन महिन्यांत उभ्या राहत आहेत. बांधकामे, गृहप्रकल्प तसेच, पत्राशेड होताना नैसर्गिक नाले, ओढे, ड्रेनेज लाईन गायब झाल्याचे आढळून येते. बांधकाम व्यावसायिकांनी स्थापत्य विभागाकडून 'ना हरकत' दाखले घेऊन काही नाले, ओढे बुजवले आहेत. नाले बुजवून भूमिगत पाईप टाकले आहेत. त्या पाईपची नियमितपणे साफसफाई होत नाही. तसेच, ते पाईप कमी व्यासाचे असतात. त्यामुळे पावसाच्या पाण्यास वाट न मिळाल्याने हाऊसिंग सोसायटी तसेच, सखल भागांत पावसाचे पाणी तुंबते. ड्रेनेजलाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अतिक्रमणामुळे अनेक भागात नाले साफसफाई करता येत नाही. अनेक वर्षाचा कचरा साचून प्रवाहाच बंद होतो. रावेत, वाकड, चिंचवड, चिखली, थेरगाव, पुनावळे, ताथवडे, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, भोसरी, पिंपरी, आकुर्डी, निगडी आदी भागांत असे प्रकार घडल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे.

कारवाई सुरू असल्याचा दावा

सर्वेक्षणात शहरातील अनेक नैसर्गिक नाले, ड्रेनेजलाईनवर अनधिकृत बांधकामे तसेच, अतिक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. ड्रेनेजलाईनमध्ये माती, दगड, कचरा आढळून आला आहे. अनेक ड्रेनेज लाईन खराब होऊन फुटल्या आहेत. काही चोकअप, ना दुरुस्त झालेल्या आहेत. ड्रेनेज लाईन, स्ट्रॉर्म वॉटर लाईन, चेंबर, नाल्यांचे पुनर्रचना करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडून उपाययोजना केल्या जात आहेत, असा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

कारवाईचा दिखाऊपणा

नाल्यांवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्याला वरदहस्त असतो. त्यामुळे तक्रारी प्राप्त होऊनही महापालिका प्रशासन व क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याची दखल घेतली जात नाही. दिखावू कारवाई करून फाईली रंगवल्या जातात. तक्रारी निरस्त करून कारवाई केल्याचा ढोल वाजवला जातो. मात्र, शहरातील एकही संपूर्ण नाला अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

आयुक्तांकडून वारंवार आदेश; कारवाई शून्य

शहरातील नैसर्गिक नाल्यावर अनधिकृत बांधकामे, पत्राशेड तात्काळ हटवा. सर्व नाले अतिक्रमणमुक्त करा. नाल्यांना मूळ स्थिती निर्माण करून द्या, असे आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना वारंवार दिले आहेत. मात्र, त्या संदर्भात ठोस अशी कारवाई होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT