Diwali Garbage Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Diwali Garbage: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या सात दिवसांत ९,६९५ टन कचरा जमा

फटाके, मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तूंच्या पॅकिंगमुळे कचऱ्याचे वजन वाढले; स्वच्छतेसाठी महापालिकेची स्वतंत्र पथके तैनात

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दीपावली सणामुळे फटाके फोडल्याने शहरात कचर्‍याचे वजन वाढले आहे. तसेच, खरेदी, भेटवस्तू व मिठाईचे बॉक्स व कागद मोठ्या प्रमाणात कचर्‍यात फेकून दिला जातो. परिणामी, सणासुदीला कचर्‍याचे वजन वाढते. असे असले तरी, महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी दैनंदिन स्वच्छतेचे काम करत, शहर चकाचक ठेवण्याचे काम केले, असा दावा प्रशासनाने केला आहे.

सणासुदीला शहरात दरवर्षी कचर्‍याचे प्रमाण वाढते. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव या काळातही कचर्‍याचे प्रमाण वाढले होते. दिवाळी सणाच्या दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. आतषबाजी व फटाके फोडल्यानंतरचा कागद व बॉक्सचे प्रमाण कचर्‍यात अधिक होते.

तसेच, मोठ्या प्रमाणात कपडे, इलेक्ट्रिक वस्तू व इतर साहित्य खरेदी केली जाते. त्याचे बॉक्स, पॅकिंग, थर्माकोल व कागद असा कचरा निर्माण होतो. भेटवस्तू तसेच, मिठाईचे बॉक्सचाही कचरा वाढतो. परिणामी, शहरात कचर्‍याचे प्रमाण अधिक होत असल्याने वजन वाढते. दिवाळीच्या सात दिवसांत एकूण 9 हजार 695. 45 टन कचरा जमा झाला. तो मोशी कचरा डेपो येथे जमा करण्यात आला आहे. ते काम शहरात दोन ठेकेदारांमार्फत केले जाते.

स्वतंत्र पथकाची नेमणूक

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटी न घेता आपले दैनंदिन काम चोख बजावले. त्यामुळे रस्ते व इतर ठिकाणी निर्माण झालेला कचरा उचलून घेऊन स्वच्छ करण्यात आला. कचरा वाढला तरी, शहरात अस्वच्छतेप्रमाणे कमी होते, असे दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी पदपथ, रस्त्यांच्या कडेला टाकलेले कचराच्या पिशव्या रात्री उचलून घेऊन तो परिसर स्वच्छ केला जातो. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. उघड्यावर कचरा टाकण्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

सण बाजूला ठेवून कर्मचारी स्वच्छतेचा कामात व्यस्त

दिवाळी सण बाजूला ठेवून महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्या काळात शहरातील स्वच्छतेवर भर दिला. नियमित कामाप्रमाणे शहर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात आला. फटाक्यांमुळे निर्माण झालेला कचरा तातडीने स्वच्छ करून घेण्यात आला. रस्त्यांवर जमा झालेल्या सर्व कचरा हटवण्यात आला, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT