पिंपरी: पावसाळा ओसरल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या अहवालात ही चिंताजनक बाब समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत शहरात मलेरियाचे १३ तर डेंग्यूचे ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
वैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार, तापाच्या २४ हजार २०७ संशयित रुग्णांपैकी मलेरियाचे १३ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूच्या १ हजार ३९५ संशयितरुग्णांपैकी ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर चिकुनगुनियाचे ४ संशयित रुग्ण आढळले आहेत. भोसरी, पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर, मोशी आणि चिखली या भागात डेंग्यूचे रुग्ण जास्त आढळले आहेत.
या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, तिथे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. तसेच. सोसायट्यांच्या टेरेसवर, भंगार साहित्यांत आणि रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचल्याने डासांना पोषक वातावरण मिळत आहे. मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शहरात घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. तसेच ब्रेक द चेनसारखे उपक्रम राबविले जात आहे. तरीदेखील कीटकजन्य आजारात वाढ होताना दिसत आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधोपचार करू नये. तात्काळ जवळच्या महापालिका दवाखान्यात जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी. घरातील पाण्याच्या टाक्या, हौद, माठ, कुलर, फ्रीजच्या मागील ट्रे दर आठवड्याला स्वच्छ करावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत आणि मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वाईन फ्लूचे ३ रुग्ण
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत शहरात स्वाईन फ्ल्यूचे ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यात ५८ रुग्ण आढळले होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत आहे. सध्या हवामानात मोठा बदल होत आहे. दिवसा कडक ऊन आणि सकाळ-संध्याकाळी थंडी असे वातावरण आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. हे तिन्ही रुग्ण वेगवेगळ्या भागातील असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
मास्कचा वापर करण्याचे आवाहन
स्वाईन फ्ल्यूची लक्षणे ही सामान्य फ्लूप्रमाणेच असतात. ताप येणे, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, थकवा जाणवणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. काही वेळा श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे, की गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत, सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे, लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.