

लोणावळा: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव व शिक्षक उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मावळ तालुक्यातून 95 टक्के मतदान मिळवून देऊ, असा विश्वास माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी लोणावळा नाणे मंडळ विभागातील बूथ कमिट्यांच्या आढावा बैठकीमध्ये व्यक्त केला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. भाजपच्या वतीने महायुतीतील घटक पक्षांच्यासोबत मावळ तालुक्यातील प्रत्येक पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत दोन्ही उमेदवारांची प्रचारपत्रके, माहितीपत्रके पोहोचवत त्यांचा कार्य अहवाल नमूद केला आहे. भाजप महायुतीचे हे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित व त्या-त्या क्षेत्रातील कामाची व समस्यांची जाण असणारे उमेदवार आहेत. त्यामुळे निश्चितच या दोन्ही उमेदवारांना पदवीधर व शिक्षक मतदार यांचा पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे. दोन्ही उमेदवार पदवीधर तसेच शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे असल्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे. मावळ तालुक्यातील प्रत्येक बूथचे नियोजन करण्यात आले असून, मतदारांपर्यंत दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक माझी आहे, असे समजून काम करावे व 23 ऑक्टोबर रोजी जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे, असे आवाहनदेखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
मावळ तालुक्यातील सर्व शहरे व मंडलांच्या बूथ कमिट्यांच्या कामांचा आणि प्रचारकार्याचा आढावादेखील या वेळी घेण्यात आला. महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आरपीआय हे पक्षदेखील प्रचारामध्ये सक्रिय असून, तेदेखील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. महायुतीने मावळ तालुक्यात प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, निश्चितच दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी व्यक्त केला. माजी राज्यमंत्री भेगडे यांनी मावळ तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. स्मिता जाधव यांना अल्पसंख्याक विकास महासंघाचा पाठिंबा
अल्पसंख्याक विकास महासंघ, महाराष्ट्रच्या वतीने पुणे पदवीदधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. तसे पत्र महासंघाच्या पदाधिकार्यांनी नुकतेच दिले आहे. पदवीधरांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार आणि सुशिक्षित तरुणांसमोरील आव्हानांवर आपण अत्यंत प्रभावीपणे भूमिका मांडत आहात. अल्पसंख्यांक समाजाची उन्नती, घटनात्मक मूल्ये आणि सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असल्याने महासंघ डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अल्पसंख्याक आणि वंचित वर्गातील सुशिक्षित तसेच, पदवीधर तरुण आणि तरुणींना रोजगार आणि व्यवसायाची संधी डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या माध्यमातून उपलब्ध व्हावी आणि त्यांना समाजात योग्य स्थान दिले जावे, अशी अपेक्षा महासंघाच्या पदाधिकार्यांनी या वेळी व्यक्त केली.
या वेळी महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रफिक कुरेशी, ज्येष्ठ नेते आनंद घेडे, शिवसेनेचे युवा विभागप्रमुख अहमद कुरेशी, पदाधिकारी जमीर कुरेशी, इस्माईल शेख, अब्दुल सलीम, अमन शेख आदी उपस्थित होते.
डॉ. स्मिता जाधव यांना आध्या सोशल फाउंडेशनचा पाठिंबा
पुणे पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना आध्या सोशल फाउंडेशनने पाठिंबा दिला आहे. फाउंडेशनचे संस्थापक अतुल पवार यांनी सांगितले, की मी स्वतः पदवीधर असून, डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या कार्याची व उमेदवारीची माहिती पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या समस्या तसेच त्यांच्या हक्कांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण विधानपरिषदेमध्ये प्रभावीपणे आवाज उठवाल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.