पिंपरी: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केला. लोणावळा येथील एका आलिशान व्हिलावर छापा टाकून चार जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचे थेट ‘चीन कनेक्शन’ उघड झाले आहे.
मोनिल अतुलकुमार मोदी (24, रा. मेहसाणा, गुजरात), रवि गोकल प्रसाद जाट (21, रा. राजगड, मध्यप्रदेश), रुद्रपाल सिंग गजेंद्रसिंग चौहान (22, रा. खंडवा, मध्यप्रदेश) आणि हंश कैलास वर्मा (19, रा. बोरीवली, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील एका नागरिकाची शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 97 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांना मोठ्या रॅकेटचा सुगावा लागला. फसवणुकीतील 8.25 लाख रुपये मोनिल मोदीच्या खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले.
मोदी हा सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना मिळत नव्हता. दरम्यान, तो लोणावळ्यातील एका व्हिलामध्ये येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे 500 व्हिलामधून आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याचवेळी व्हिलामध्ये उपस्थित असलेल्या इतर तिघांनाही अटक करण्यात आली. चौघांकडून एक लॅपटॉप, सात मोबाईल, 14 डेबिट कार्ड, दोन वेबकॅमेरे, पाच बँक अकाउंट किट आणि एक रबरी स्टॅम्प असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी वेबकॅमेऱ्याच्या निगराणीत बसून विविध बँक खात्यांतील रक्कम एकत्र करत होते. मोनिल मोदी याच्याकडे नऊ बँकांची करंट खाती असून, त्यातून एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केल्याचे समोर आले आहे. रवी जाट आणि रुद्रपाल चौहान हे पैसे पुढील खात्यांमध्ये वर्ग करत होते, तर हंश वर्मा त्यांच्यावर देखरेख ठेवत होता. या चौघांवर हाँगकाँगमधील अज्ञात सूत्रधारांकडून नियंत्रण ठेवले जात होते. फसवणुकीची रक्कम ‘यूएसडीटी’ (क्रिप्टो करन्सी)मध्ये रूपांतरित करून परदेशात पाठवली जात होती. बदल्यात मोनिल मोदी याला एक टक्का कमिशन, तर इतरांना यूएसडीटीमध्ये पगार दिला जात होता.
‘किंग पेमेंट ग्लोबल’ या कंपनीत नोकरी दिल्याचे बनावट पत्र आणि ओळखपत्रही आरोपींना देण्यात आले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी साखळी समोर येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांच्या पथकाने केली.