

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. ते प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र आठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना संपर्क साधल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा दावा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केला आहे.
मोकाट कुत्री व त्यांच्या हल्ल्याबाबतच्या तक्रारींचे निवारण प्रामुख्याने केंद्रस्तरावरून होत असल्याने कार्यवाहीस वेळ लागत होता. अधिकारी नागरिकांसह नगरसेवकांचे फोन उचलत नव्हते. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागावर रोष व्यक्त केला जात होता. आता, ती कार्यवाही महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयस्तरावर होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आला आहे. संबंधित नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीनुसार संबंधित अधिकार्यांकडे तक्रार करावी. महापालिकेमार्फत ही सर्व कामे भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार आहेत.
तक्रारींचा जलद निपटारा
शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासासंदर्भात तक्रारी मांडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावरच सक्षम यंत्रणा उभी केली जात आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्र समन्वय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल, असा दावा महापौर रवी लांडगे यांनी केला आहे.