Cyber Crime Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Cyber Crime Awareness: पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्ह्यांविरोधात ३१ दिवसांचा ‘ॲक्शन प्लान’

डिजिटल अरेस्ट, केवायसी-यूपीआय फसवणुकीपासून म्युल खात्यांपर्यंत जनजागृती; पोलिस ठाणेनिहाय विविध उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ऑक्टोबरमध्ये ठाणेनिहाय ३१ दिवसांचा सायबर जनजागृती 'ॲक्शन प्लान' राबविण्यात येणार आहे. १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक पोलिस ठाण्याला दिवसनिहाय कार्यक्रम देण्यात आला असून, शाळा-महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, बाजारपेठा, बँका, कामगार वस्त्या, शासकीय कार्यालये आणि वाहतूक केंद्रांपर्यंत पोलिस प्रत्यक्ष पोहोचणार आहेत. महाराष्ट्र सायबर आणि भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) समन्वयातून ही मोहीम राबविली जाणार आहे.

समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित करण्यापुरती ही मोहीम मर्यादित राहणार नाही. नागरिकांशी थेट संवाद साधून फसवणुकीपूर्वीच सावध करणे, प्रलंबित पैसे परतावा प्रकरणांना गती देणे, तक्रारी निकाली काढणे आणि गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या म्युल खात्यांची तसेच पैसे काढण्याची साखळी ब्रेक करणे, अशी मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा’

मोहिमेची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिल्या दिवशी नागरिकांसाठी जनजागृती संदेश प्रसारित केले जातील. २ ऑक्टोबर रोजी 'क्लिक करण्यापूर्वी विचार करा' ही सायबर प्रतिज्ञा शाळा, महाविद्यालये आणि पोलिस ठाण्यांमध्ये घेतली जाईल. ३ ऑक्टोबर रोजी सायबर मदत क्रमांक १९३०, डिजिटल अफवा, छायाचित्रांमध्ये फेरफार आणि बनावट दृश्यफीत याबाबत मोहल्ला व शांतता समित्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. ४ ऑक्टोबरपासून बीट अंमलदार गृहनिर्माण संस्था आणि प्रमुख ठिकाणी माहितीपत्रके व पडताळणी मार्गदर्शिका वितरित करणार आहेत. ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सायबर फसवणुकीतील पीडित आणि ज्येष्ठ नागरिकांवर भर राहणार आहे.

डिजिटल अरेस्ट, केवायसी फसवणूकविषयी जनजागृती

१२ ते २० ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र सायबर धोका निश्चित करण्यात आला आहे. डिजिटल अरेस्ट, अनधिकृत ॲप फाइल्स, केवायसी फसवणूक, बनावट शेअर व्यवहार, ऑनलाइन कर्ज ॲप, बनावट खरेदी संकेतस्थळ, वीज-गॅस अथवा दूरसंचार सेवा बंद करण्याची धमकी देऊन होणारी फसवणूक, विवाहविषयक संकेतस्थळांवरील फसवणूक आणि बनावट ग्राहकसेवा क्रमांक अशा नऊ प्रकारांवर स्वतंत्र जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालये, व्यापारी संघटना, औद्योगिक आस्थापना, निवासी संकुले, महिला संस्था, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांपर्यंत पथके पोहोचणार आहेत.

युपीआय फसवणूक अन्‌ धोकादायक ॲप्सबाबत माहिती

८ ते ११ ऑक्टोबरदरम्यान तक्रार निवारण, सुरक्षित डिजिटल बँकिंग आणि व्यापारी-ग्रामीण जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. बाजार समित्या, मंडई, ग्रामपंचायत आणि नागरी प्रभाग कार्यालयांमध्ये यूपीआय फसवणूक आणि धोकादायक ॲप्सबाबत नागरिकांना सावध केले जाईल. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी मोहिमेचा आढावा घेणार आहेत.

पीडितांशी संपर्क साधून मार्गदर्शन

प्रत्येक पोलिस ठाण्याने प्रलंबित पैसे परतावा प्रकरणांतील किमान ५० टक्के पीडितांशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. ज्येष्ठ नागरिक उद्याने, हास्यक्लब आणि कल्याण संघटनांमध्ये विशेष पथके जाऊन डिजिटल अरेस्ट आणि पेन्शन फसवणुकीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

बँक अधिकाऱ्यांसोबत बैठका

२१ ऑक्टोबरपासून सायबर गुन्ह्यांच्या आर्थिक साखळीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि खासगी बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन केवायसी नियमांचे पालन, मोठ्या आर्थिक व्यवहारांवरील सतर्कता, संशयित म्युल खाती तसेच एटीएम आणि धनादेशातून पैसे काढण्याची संशयास्पद ठिकाणे यांची माहिती तपासली जाणार आहे. खाते उघडण्यातील त्रुटी आणि अनधिकृत पैसे काढण्याच्या केंद्रांचाही शोध घेतला जाणार आहे.

झोपडपट्टी, कामगार वस्त्यांत मागदर्शन

२३ ऑक्टोबर रोजी सिमकार्ड वितरण केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. २४ आणि २५ ऑक्टोबरला झोपडपट्टी व कामगार वस्त्यांमध्ये जाऊन पैशांच्या मोबदल्यात स्वतःचे बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास देण्याचे धोके समजावून सांगितले जातील. २६ ऑक्टोबरला महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक कागदपत्रे, ओळखपत्रे किंवा बँक खाती दुसऱ्याला देण्याचे कायदेशीर परिणाम, छायाचित्र फेरफार, बनावट दृश्यफीत आणि डिजिटल अफवांबाबत मार्गदर्शन केले जाईल.

'डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य'

महिनाभराच्या मोहिमेचा समारोप ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या स्तरावर सकाळी सात वाजता 'डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य' या घोषवाक्याखाली धाव अथवा सायकल फेरी आयोजित केली जाणार आहे. महिनाभरातील कार्यक्रमांची दैनंदिन नोंद ठेवून किती रक्कम परतावा प्रकरणे निकाली निघाली, किती नागरिक सहभागी झाले, किती संस्था व बाजारपेठांपर्यंत मोहीम पोहोचली आणि किती तक्रारी निकाली काढल्या, यावर मोहिमेचे मूल्यमापन केले जाणार आहे.

सात टप्पे

१ ते ४ ऑक्टोबर मोहिमेची पायाभरणी, ५ ते ७ ऑक्टोबर पीडित मदत व ज्येष्ठ नागरिक सुरक्षा, ८ ते ११ ऑक्टोबर व्यापारी-ग्रामीण जनजागृती व आढावा, १२ ते २० ऑक्टोबर दररोज स्वतंत्र सायबर फसवणूक प्रकारावर मोहीम, २१ ते २६ ऑक्टोबर म्युल खाते व आर्थिक साखळीविरोधात कारवाई, २७ ते ३० ऑक्टोबर सायबर स्वच्छता आणि ३१ ऑक्टोबरला राज्यव्यापी जनजागृती धाव, असा महिनाभराचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सायबर स्वच्छता मोहीम

२७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान सायबर स्वच्छता मोहिमेत मजबूत संकेतशब्द वापरणे, समाजमाध्यम खात्यांवर अतिरिक्त सुरक्षा पडताळणी ठेवणे, ॲप्स व संगणक प्रणाली अद्ययावत ठेवणे, अनावश्यक ॲप्स काढून टाकणे, माहितीचा सुरक्षित साठा आणि गोपनीयता मांडणी याबाबत पोलिस कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयांत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सायबर गुन्ह्यांची पद्धत सातत्याने बदलत आहे. त्यामुळे नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना वेळेत सावध करणे आवश्यक आहे. ऑक्टोबरमध्ये पोलिस ठाणेनिहाय दिवसवार कार्यक्रम राबवून विविध वयोगट आणि घटकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता १९३० या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास अशा गुन्ह्यांना आळा घालणे अधिक परिणामकारक ठरेल.
रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT