Crime News Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीला ऊत; घरात घुसून महिलेला मारहाण, जुगार अड्ड्यावर छापा

केस मागे घेण्यासाठी धमकी; २२ जणांवर जुगाराचा गुन्हा, गांजा विक्रेत्यांवर कारवाई अन् दोन लाखांचे एमडी जप्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: न्यायालयातील केस मागे घेण्यासाठी धमकी देत चार जणांनी घरात घुसून महिलेला मारहाण केली. या झटापटीत महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी गहाळ झाली. ही घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा ते रात्री साडेनऊच्या दरम्यान संत गजानन महाराजनगर, दिघी येथे घडली. याप्रकरणी एका ३७ वर्षीय गृहिणीने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी महिला, एक वकील आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादींच्या घरात प्रवेश केला. आरोपी वकिलाने ‘आम्ही कोर्टातून आलो आहोत, केस मागे घेतली नाही तर बघून घेऊ,’ अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीला घराबाहेर ओढून शिवीगाळ केली. रात्री पुन्हा एका आरोपी महिलेने त्यांना मारहाण केली. या झटापटीत गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी तुटून गहाळ झाली.

जुगार अड्ड्यावर छापा; २२ जणांवर गुन्हा

तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास रावेत येथील कचरा डेपोजवळ करण्यात आली.

याप्रकरणी पोलिस शिपाई विक्रम कुदळे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन जोगदंड, सद्दाम शेख, अवधूत पारखी, आकाश खराटे, सचिन चौगुले यांच्यासह २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने आपल्या जागेत बेकायदा जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. तेथे तीन पत्तीच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार सुरू होता. गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारी करण्यात आली. याप्रकरणी पोलिस अंमलदार वैभव वाटकर यांनी भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुरेंद्र रोहित सोनार (१९, रा. भोसरी) आणि सचिन शंकर चव्हाण (२८, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

दोन लाखांचे एमडी जप्त

बेकायदा एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी रात्री सातच्या सुमारास निगडी-आकुर्डी परिसरातील थरमॅक्स चौकाजवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिस शिपाई विशाल गायकवाड यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुजल बाळू येवले (२२, रा. वडगाव मावळ, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी थरमॅक्स चौकाकडून दुर्गा चौकाकडे जाणाऱ्या मोकळ्या जागेत संशयितरीत्या थांबला होता. त्याच्या झडतीत ६.४०० ग्रॅम मेफेड्रॉन, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण एक लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गांजा विक्रीप्रकरणी गुन्हा

विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई १४ ऑगस्ट रोजी रात्री सातच्या सुमारास भोसरीतील विरंगुळा केंद्राच्या पाठीमागे करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT