पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात प्रवेश देण्यासाठी 1 मेपासून ‘स्वागतम ई पास’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पास असल्याशिवाय महापालिकेत प्रवेश दिला जात नाही. आत्तापर्यंत एकूण 7 हजार 894 जणांनी पास काढून महापालिका भवनात प्रवेश केला आहे.
पाससाठी नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुख्य इमारत प्रवेश प्रणाली या लिंकद्वारे आपली नोंदणी करावी लागते. ऑनलाइन नोंदणीसाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असून, नागरिकांनी या नव्या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
नोंदणी केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत (शनिवार, रविवार आणि शासकीय सुटी वगळता) महापालिकेत प्रवेश करता येणार आहे. त्यानुसार, इच्छित दिनांक व संबंधित विभाग निवडून नोंदणी करता येईल.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर क्युआर कोड डाउनलोड करता येईल. हा क्युआर कोड प्रवेशद्वारावर दाखविल्यानंतर तो स्कॅन करून प्रवेश दिला जातो.
नागरिक त्यांच्या लॉगिन अकाऊंटवरून क्युआर कोड कधीही डाउनलोड करू शकतात. आगाऊ तारखेसाठी नोंदणी केल्यास क्युआर कोड डाउनलोड करण्याची सुविधा संबंधित प्रवेशाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात आली आहे.