CNG Waiting Line Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri CNG Shortage: पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी तुटवडा; रिक्षाचालकांना तासन्तास रांगा

पिंपरी-चिंचवड आणि राज्यात सीएनजी तुटवड्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षा आणि कॅबचालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

बलभीम भोसले

दापोडी: सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढलेला असतानाही ते वेळेवर मिळत नसल्याची स्थिती आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तांत्रिक बिघाड, पुरवठ्यातील अडथळे आणि इंधन केंद्रांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे ही परिस्थिती उद्भवली असून, वाहनचालकांना सीएनजी भरण्यासाठी तासन्तास रांगेमध्ये थांबावे लागत आहे. सध्या गॅसचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहराला सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) व एमएनजीएल (महाराष्ट्र नॅचरल गॅस) दिवसाला दोन लाख किलो ही दहा वर्षांसाठी मर्यादा होती. मात्र, ही मर्यादा तीन वर्षांमध्येच पूर्ण झाल्याने आज संपूर्ण शहरामध्ये गॅस तुटवडा जाणवत आहे. आज शहरातील सीएनजी वाहनांची संख्या मर्यादेपेक्षा वाढलेली आहे. तसेच घरगुती गॅसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये गॅसचा तुटवडा जाणवत आहे. पंपावर कामगारांकडून गॅसची गाडी आलेली नाही, लाईट गेलेली आहे, आत्ताच गाडी संपली या ना त्या कारणांमुळे सीएनजी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पंपचालक व शासन गॅसचा तुटवडा नाही असे सांगत आहेत; परंतु नागरिक वाहने घेऊन गेल्यानंतर इंधन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात सीएनजी तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा वेगाने पसरत असल्या, तरी प्रत्यक्षात सध्या सीएनजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. अशी फक्त चर्चा सुरू आहे. वाहनचालकांनी विनाकारण घाबरून पंपांवर गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पंपचालक करीत आहेत. शहरात 70 ते 75 सीएनजी पंप आहेत. काही दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा बंद होणार, पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशा अफवांमुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक जण वाहनांच्या टाक्या भरून घेत असून, काही ठिकाणी पंपांवर अचानक गर्दी होत आहे.

सद्यस्थिती आणि समस्या

  • पहाटेपासून रांगा : सीएनजी मिळवण्यासाठी वाहनचालक, विशेषतः रिक्षाचालक पहाटेपासून रांगा लावत आहेत.

  • वेळेची मर्यादा : काही भागांमध्ये कमी पुरवठ्यामुळे सीएनजी पंप दररोज काही ठराविक तास बंद ठेवले जात आहेत.

  • वाहतुकीवर परिणाम : तुटवड्यामुळे रिक्षा आणि कॅबचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, दैनंदिन वाहतुकीवरही याचा परिणाम होत आहे.

शहरातील सीएनजी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच एमएनजीएलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सीएनजी ऑनलाईन व ऑफलाईन जरी असेल तरी सीएनजीला ठराविक प्रेशर असते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. वाहनांची संख्या जास्त व सीएनजी पंपांची संख्या कमी असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे.
प्रशांत शितोळे, सीएनजी पंप व्यवस्थापक, नवी सांगवी
सीएनजी सध्यातरी संपूर्ण महाराष्ट्रात सुरळीत मिळत नाही. परंतु, तुटवडा भासू शकतो. या शक्यतेने वाहनचालक घाबरत आहेत. पुरवठा कधीही बंद होईल, या भीतीने मी मोटारीची टाकी भरून ठेवतो. ग््राामीण भागामध्ये सीएनजी पंपांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. ग््राामीण भागामध्ये सीएनजी भरणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.
विजय वानखेडे, सीएनजी वाहनचालक
मला धाराशिवला जायचे होते. जाताना चार सीएनजी पंप आहेत, मात्र एकाही पंपावर मला सीएनजी भेटला नाही. एका ठिकाणी सीएनजी होता मी अर्धा तास रांगेत होतो. जवळजवळ 50 गाड्यांची लाईन होती. ज्या वेळी माझा नंबर आला त्या वेळी सीएनजी संपले होते. नेहमीच विविध कारणे ऐकावे लागतात. त्यामध्ये डीपी बॉक्स जळाला आहे. लाईट गेली आहे. सीएनजी संपला आहे. गाडी कधी येणार माहीत नाही, अशी विविध कारणे ऐकून घ्यावे लागतात. त्यासाठी सरकारने सीएनजी पंपांची संख्या वाढवावी.
गंगाराम पवार, सीएनजी वाहनचालक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT