पिंपरी: छट हा सूर्यदेवाची उपासना करण्याचा महत्त्वाचा सण आहे. हा प्रामुख्याने बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशात थाटामाटात साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरातदेखील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. दिवाळीनंतर येणारा छटपूजेच्या तयारीत सध्या उत्तर भारतवासीय गुंतले आहेत.
हा सण सूर्यदेव आणि छठी मातेला समर्पित आहे, ज्यामध्ये मुलांच्या सुख-समृद्धीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी ३६ तासांचा उपवास ठेवला जातो. हा सण आत्म-शुद्धी, मुलांची सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या आनंदाचे प्रतीक मानला जातो. १५ नोव्हेंबर (रविवार) रोजी मावळत्या सूर्याला अर्घ्य आणि १६ नोव्हेंबर (सोमवार) रोजी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छटपर्वाची सांगता होईल.
शुकवार (दि. १३) छटपूजेच्या व्रताला सुरुवात झाली आहे. महिला स्नान करून आपली घरे शुद्ध करतात आणि भोपळा व चण्याच्या डाळीचा प्रसाद बनवून ग्रहण करतात. उद्या शनिवार ( दि. १४) व्रती दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गुळाची खीर आणि पोळी खाऊन व्रत पूर्ण करतात.
रविवारी (दि.१५) पहिले अर्घ्य मावळत्या सूर्याला पाणी, दूध आणि फुले अर्पण केली जातात. महिला पाण्यात उभे राहून सूर्यदेवाची पूजा करतात. सोमवारी दुसरे अर्घ्य (१६ नोव्हेंबर ) उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन व्रताची सांगता केली जाते. त्यानंतर कुटुंबासोबत प्रसाद ग्रहण केला जाणार आहे. यासाठी शहरातील इतर घाटांवर सर्व उत्तर भारतीय बांधव शहरातील नदीघाटावर पूजेसाठी गर्दी करतात.