पिंपरी: महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या एका अट्टल चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने फिल्मी स्टाईल पाठलाग करुन जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सांगवी, दापोडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील अशा एकूण पाच गुन्ह्यांची उकल झाली असून, १५ लाख रुपये किमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
सुमित गोविंद इंगळे (३१, रा. मामुर्डी गाव, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी हिंजवडी, सांगवी, शिरवळ आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीचे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सांगवी पोलिस ठाण्याच्याहद्दीतील विशालनगर, पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाईज फेज-१ समोरील रस्त्यावरून एक व्यक्ती पायी जात असताना अज्ञात चोरट्याने स्पोर्ट बाईकवरून येत त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून नेली. या घटनेनंतर सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट एकने तपासाची चक्रे फिरवली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी गुन्ह्यानंतर बंगळूर महामार्गाचा वापर करून पसार होत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, आरोपी वारंवार बाणेर परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरात दोन ते तीन दिवस अहोरात्र सापळा रचला. दरम्यान, ७ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी सुमित इंगळे हा पुन्हा चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशाने बाणेर परिसरात आला. या वेळी पोलिसांची चाहूल लागताच त्याने स्पोर्ट बाईकवरून भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अखेर त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपीने एकट्यानेच चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात सांगवी, दापोडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्याहद्दीतील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून १५ लाख रुपये किमतीचे ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, महिला पोलिस हवालदार उषा दळे, पोलिस हवालदार महादेव जावळे, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, विजय शेळकंदे, पोलिस शिपाई संदेश देशमुख, विजय जानराव, तेजस भालचिम, सोहेल चिखलकर आणि केशव चपटे यांच्या पथकाने केली.
थरार सीसीटीव्हीत कैद
आरोपीला पकडताना पोलिसांनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधानाची चर्चा सुरू आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने भरधाव वेगाने स्पोर्ट बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी त्याला शिताफीने रोखले. धावत्या बाईकला धक्का देत पोलिसांनी आरोपीला खाली पाडले. त्यानंतर पोलिस हवालदार शिवराम भोपे आणि महादेव जावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भोपे आणि जावळे यांनी दाखवलेल्या धाडसाचे व प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.