Pune Metro Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Neo Metro: पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस मार्गावर निओ मेट्रो प्रस्ताव; महामेट्रोकडून डीपीआर तयार होणार

पुणे-नाशिक महामार्ग ते वाकड चौक दरम्यान मेट्रो मार्गाचे नियोजन; स्थायी समितीसमोर खर्च प्रस्ताव सादर

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-नाशिक महामार्ग ते मुंबई बंगळुर महामार्गास जोडणार्‍या बीआरटीएस मार्गावर (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रॉन्झिट सिस्टीम) इलेक्ट्रिक मेट्रो सुरू करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महामेट्रो तयार करणार आहे. बीआरटीएस मार्गास प्रवाश्यांचा प्रतिसाद नसल्याने निओ मेट्रोचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरीहून स्वारगेट अशी मेट्रो धावत आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम वेगात सुरू आहे. तसेच, निगडी ते चाकण या नवीन मार्गाचा सुधारित डीपीआर तयार करण्यात आला आहे. मात्र, तो मंजुरीअभावी महापालिकेत धूळखात पडून आहे.

शहराचे नागरीकरण वेगाने वाढत असून, शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा महापालिकेने उपलब्ध करून देण्याचा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 11 एप्रिल 2025 ला मुंबईत बैठक झाली होती. त्या शहरातील नवीन मेट्रो मार्ग तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. बीआरटीएस मार्गास प्रवाश्यांचा अल्प प्रतिसाद आहे. त्या मार्गावर इलेक्ट्रिक मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव महामेट्रोने दिला होता.

त्यानुसार, पुणे-नाशिक महामार्ग ते मुंबई बंगळुर महामार्गास जोडणार्‍या भोसरीतील गोडाऊन चौक, नाशिक महामार्ग, कुदळवाडी चौक, ऑटो क्लस्टर, काळेवाडी फाटा चौक, जगताप डेअरी चौक, वाकड चौक या बीआरटीएस मार्गावर मेट्रो मार्गाचे नियोजन करण्यात आले आहेत. त्याचा डीपीआर महामेट्रो तयार करणार आहे. डीपीआर तयार करण्यासाठी महामेट्रोने 85 लाख 41 हजार 985 रुपये खर्च असल्याचे कळवले आहे. त्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

..असा आहे नवा मेट्रो मार्ग

गोडाऊन चौक-नाशिक महामार्ग-कुदळवाडी चौक-ऑटो क्लस्टर-काळेवाडी फाटा चौक-जगताप डेअरी चौक-वाकड चौक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT