पिंपरी: भाजप पक्षासाठी अहोरात्र राबणार्या तसेच, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्यांनाच यापुढे संधी दिली जाणार आहे. त्यांनाच पदे दिली जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेत्यांवर अवलंबून असलेल्या कार्यकर्त्यांची व इच्छुकांची गोची झाली आहे. तसेच, पक्षाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा, असे संदेश त्यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना दिला आहे.
पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.29) कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये झाली. बैठकीस महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, माजी आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रभारी भरत पाटील, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी खा. अमर साबळे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, मधूकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बैठकीत स्पष्ट केले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्यांना संधी दिली जाणार आहे. पक्ष विरोधी काम करणार्यांना कोणतेही पद दिले जाणार नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकार्यांनी अशा व्यक्तींची शिफारस प्रदेश तसेच, शहर कमिटीकडे करू नये. पक्ष शिस्तीचे पालन सर्वांनी करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणार्यांची यादी प्रदेश कमिटीकडे पूर्वीच सादर करण्यात आली आहे.
प्रदेश कमिटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभराच्या सेवा संकल्प अभियान अंतर्गत शहरासाठी तसेच, आमदार, नगरसेवकांसाठी तेरा वेगवेगळे कार्यक्रम आयोजनाचे निर्देश दिले आहेत. त्यापैकी केवळ दोन कार्यक्रम आत्तापर्यंत झाले आहेत. आचारसंहितेमुळे कार्यक्रम घेता येत नसल्याची खंत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
या अभियानाचा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आढावा घेतला. कोअर कमिटीची बैठक घेऊन सदस्यांना पक्ष शिस्त आणि पक्षाच्या धोरणांबाबत स्पष्ट सूचना दिल्या. तसेच शहर दौऱ्यात विविध कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यानंतर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल कलाटे, पदाधिकारी राम वाकडकर, माजी महापौर उषा ढोरे आदींच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. तब्बल बारा तासांच्या शहर दौर्यात त्यांनी बंद दाराआड काही बैठका घेतल्या, त्यात पदाधिकाऱ्यांना पक्षाची दिशा ठरवून दिल्याचे समजते.
स्वीकृतसाठी इच्छुक असलेले सलाईनवर
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, स्वीकृत नगरसेवकांची निवड आचारसंहितेमुळे होणार नाही. या स्थितीत आता, स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागते की नाही, असे स्थानिक नेत्यांवर विसबूंन असलेल्या इच्छुकांमध्ये चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षांच्या धोरणात बसत नसल्याने बहुतांश इच्छुक सलाईनवर आहेत.
कोणती जागा लढवायची याचा निर्णय नेते घेणार
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील चार जागांबाबत कोणी कोणती जागा लढवायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील. मात्र, भाजप संघटनात्मक तयारीला लागला असून मतदार नोंदणीपासून ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या नियोजनापर्यंत तयारी सुरू केली आहे. मंडलाध्यक्ष आणि स्थानिक पदाधिकार्यांना जबाबदार्या देण्यात आल्या असून, यासंदर्भात ऑनलाइन बैठका झाल्या आहेत. वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, त्याच दिशेने पक्षाची संघटना व कार्यकर्ते पुढे जातील, असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.
आरोप करण्याऐवजी प्रश्नांवर लक्ष देण्याचा विरोधकांना सल्ला
निवडणूक आयोगाबाबतच्या विरोधकांच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, सरकार आणि सरकारी यंत्रणांवर उपस्थित केले जाणारे आरोप, निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रवक्त्यांकडून या विषयावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे वारंवार त्याच मुद्द्यांवरून आरोप करण्याऐवजी महाराष्ट्रासमोरील प्रत्यक्ष प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. दुष्काळजन्य परिस्थिती, शेतकरी आणि महाराष्ट्रासमोरील विविध आव्हानांवर सरकार काम करत आहे, राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जात आहे, असे ही ते म्हणाले.