पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर पदावर भोसरी विधानसभेचे नाही, तर भाजपचे रवी लांडगे यांचे नाव एकमताने निश्चित झाले आहे. ते चिंचवड व भोसरी विधानसभेसाठी दुवा म्हणून संपूर्ण शहरासाठी काम करतील. त्या पदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, एकालाच ते पद देता येते. त्यामुळे इच्छुक इतर नगरसेवक नाराज होणे स्वाभाविक आहे. जे उपस्थित नाहीत, ते आनंदी नाहीत, असे म्हणता येणार नाही, असे सांगत भाजपचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी महापौरपद निवडीमध्ये पक्षात सर्व आलबेल असल्याचा दावा केला आहे.
महापौर पदासाठी भाजपत अनेकजण इच्छुक होते. महापौरपद न दिल्याने नगरसेवक शीतल शिंदे हे उपमहापौर पदाचा अर्ज न भरता निघून गेले. तर, महापौर पदासाठी तीव इच्छुक असलेले शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हेही उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळेस गैरहजर होते. त्यासंदर्भात विचारले असता शितोळे म्हणाले, की पक्षाने उपमहापौर पदासाठी अनेकांची नावे दिली होती. शीतल शिंदे यांनी अर्ज भरण्यास नकार दिल्याने शर्मिला बाबर यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षाकडून विविध पदावर नगरसेविकांना संधी दिली जाणार आहे. या वेळी महापौर पदाचा अर्ज भरणारे रवी लांडगे, उपमहापौर पदाचा अर्ज भरणाऱ्या शर्मिला बाबर, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, सदाशिव खाडे व पदाधिकारी उपस्थित होते.
विरोधातील सहकारींना विकासासाठी सोबत घेणार
भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादी काँग््रेासने शहराच्या विकासासाठी निवडणूक लढविली. विकासकाम करण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर विरोधक न राहता ते सहकारी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकत्रित येऊन काम करतील. अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण चित्रच बदलले आहे. दोन्ही पक्षात कोणताही कलह नाही. सहकारी असलेल्या विरोधकांना सोबत घेऊन काम केले जाईल, असे सांगून उपमहापौरपद विरोधकांना देण्याबाबत वरिष्ठांकडून निर्णय घेतला जाईल, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले. ते स्वत: निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग््रेासमधून भाजपत आले असल्याने त्यांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी स्नेहाचे संबंध आहेत.
अजितदादा असते, तर त्यांना सर्वांधिक आनंद झाला असता
अजितदादा पवार असते, तर मला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सत्तारूढ पक्षनेता झालेला पाहून त्यांना सर्वांधिक आनंद झाला असता. मात्र, त्यांचे अपघाती निधन झाले, अशी भावना सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांच्या पत्नी व आईही उपस्थित होत्या. त्यांची नगरसेवक पदाची ही चौथी टर्म आहे.
महापौर पदासाठी शहराध्यक्ष काटेंकडून मला शुभेच्छा
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याशी माझे फोनवरून बोलणे झाले आहे. महापौर पदासाठी माझे नाव निश्चित झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत, असे रवी लांडगे यांनी सांगितले.
अजितदादांच्या निधनामुळे निवडीनंतर जल्लोष नाही
महापौर व उपमहापौर पदाची निवड शुक्रवारी (दि. 6) जाहीर होणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने या निवडीनंतर जल्लोष करण्यात येणार नाही. राजकीय संस्कृती जपून आनंद व्यक्त केला जाईल, असे प्रशांत शितोळे यांनी सांगितले.
नाराजी नाट्यामुळे दोन्ही आमदारांनी प्रसारमाध्यमाशी टाळला संवाद
नगरसेवक शीतल शिंदे हे उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज न भरता निघून गेल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर संभम निर्माण झाला होता. उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर, कैलास कुटे व अभिषेक बारणे यांची नावे समोर आली. त्यातून शर्मिला बाबर यांच्या नावावर एकमत झाले. या नाराजी नाट्यामुळे आमदार महेश लांडगे व शंकर जगताप हे प्रसारमाध्यमांशी न बोलता निघून गेले. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आमदार अमित गोरखे व उमा खापरे यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला.