पिंपरी: पालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून ‘अब की बार सौ पार’ नारा देण्यात आला होता; परंतु काही ठिकाणी दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तर, काही ठिकाणचे उमेदवार कमी मतांच्या फरकाने विजयी झाले. या पराभवाची कारणे शोधून त्याबाबतचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे दिला जाणार असून, त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शत्रुघ्न काटे यांनी सांगितले, की नेमक्या कोणत्या कारणामुळे आम्हाला काही प्रभागात पराभव सामना करावा लागला त्याची कारणे शोधत आहोत.
तेथे कोणी पक्षविरोधी काम केले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शहरातील वाढत्या लोकसंख्येस अतिरीक्त पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दिवसाआड पुरेशा प्रमाणात पाणी दिले जाईल. दरम्यान, विकास आरखाडा प्रकरणात ज्या ठिकाणी चुकीचे आरक्षण पडले होते, त्यासाठी आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
मेट्रोचे विस्तारीकरण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, नियमित पाणीपुरवठा, नदी सुधार योजना, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, कला, क्रीडा, महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका देशात प्रथम क्रमांकाने ओळखली जावी यासाठी नियोजन केले जाईल.
राष्ट्रवादीचा सहभाग नसेल
महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महापौर आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यानंतर महापौरांची निवड होईल. दरम्यान, भाजपचा महापौर होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करुन घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, महापौर हा शहराचा असेल, तो कोणत्या विधानसभा मतदारसंघाचा नसेल, असेही शहराध्यक्ष काटे यांनी स्पष्ट केले.