विजय जगदाळे
भोसरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे सहल केंद्र उभारण्यात आले आहे; परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हे सहल केंद्र समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. या सहल केंद्रामध्ये बच्चेकंपनीसाठी झुकझुक गाडी, बाल उद्यानातील खेळणी, भुलभुलैय्या, किल्ला आदी मनोरंजनात्मक गोष्टींमुळे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत गर्दी असते. परंतु, केंद्रातील खेळण्यांची दुरवस्था, परिसरात जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था, निखळलेले पेव्हिंग ब्लॉक्स, बंद अवस्थेतील झुकझुक गाडी, बोटिंग क्लब बंद असल्याने लहान मुलांच्या आनंदावर विरजण पडत आहे. मात्र, या सहल केंद्राकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे केंद्राची दुरवस्था झाली आहे. सहल केंद्रातील दुरवस्था उद्यान विभागाने तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भोसरी परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. परंतु, येथील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानात बच्चे कंपनीसाठी बसविण्यात आलेली अनेक खेळणी तुटलेली आहेत. किल्ल्याची दुरवस्था, किल्ला कायमच बंद असतो. बच्चे कंपनीसाठी आगगाडी आहे परंतु बिघडलेली आगगाडी बंदिस्त होत फक्त शोभेची बाहुली झाली आहे. परिसरातील सिमेंटची पेव्हिंग ब्लॉक उखडले आहेत. उद्यानात ठिकठिकाणी असलेल्या फायबर कचराकुंड्या जीर्ण होऊन तुटलेल्या अवस्थेत स्मार्ट सिटीचे दर्शन घडवीत आहेत. स्वच्छतागृहाची अवस्थादेखील दयनीय झाली आहे. केंद्रातील खेळणी तुटलेले असल्याने बालचमूला आनंद लुटता येत नसल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.
नियोजनशून्य कारभाराचा फटका
सध्या शहरातील सर्व शाळांना उन्हाळी सुटी लागली आहे. उकाड्याने नागरिक व लहान मुले हैराण आहेत. घरात बसले तरी गर्मीने जीव नकोसा होत आहे. मुले आरडाओरडा करत आहेत. त्यांना खेळण्यासाठी व मनोरंज करण्यासाठी येथील सहल केंद्रात पालक घेऊन येत आहेत. परंतु, महापालिकेच्या उद्यान व क्रीडा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हे सहल केंद्र असून अडचण आणि नसून खोळंबा अशा स्थितीत आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. लहान मुलांची घोर निराशा होत आहे. उद्यान विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
आगगाडी बनली शोभेची वस्तू
या सहल केंद्रातील मिनी आगगाडी हे लहान मुलांचे मुख्य आकर्षण मानले जात होते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ही आगगाडी बंद अवस्थेत आहे. गाडीचा ट्रॅक खराब झाला असून, इंजिन नंदुरुस्त आहे. त्यामुळे मुलांना झुकझुक गाडीचा आनंद घेता येत नसल्याने लहान मुलांमध्ये नाराजी पसरली आहे.
किल्ला व ध्यानकेंद्र भग्नावस्थेत
सहल केंद्रातील किल्ला, ध्यानकेंद्र आणि इतर वास्तूंची स्थितीही अत्यंत बिकट झाली आहे. भेगा पडलेल्या भिंती, गळती, गवताचे वाढलेले सामाज्य आणि प्रकाशयोजनेचा अभाव यामुळे अनेक वर्षांपासून या वास्तू बंद असल्याने त्याचा वापर पूर्णपणे बंद झाला आहे.
उद्यानात खेळणी बसविण्यासंदर्भात वर्कऑर्डर संबंधित ठेकेदाराला दिली आहे. स्पेअर पार्ट्स बसविण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच झुकझुक गाडी बसविण्याबाबत कन्सल्टंट नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.महेश गारगोटे, मुख्यउद्यान अधीक्षक, मनपा.