Cyber Fraud Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Cyber Fraud: पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट बँक खात्यांचा वापर करून लाखोंची फसवणूक; तीन गुन्ह्यांत २२ लाखांहून अधिक रक्कम लंपास

थेरगाव, भोसरी आणि बावधनमध्ये सायबर फसवणुकीचे प्रकार उघड; देशभरातील २३ नागरिकांना बनवले लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: स्वतः च्या नावाने बँक खाते उघडून त्याद्वारे देशभरातील १० नागरिकांची नऊ लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ ऑक्टोबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत थेरगाव येथील गुजरनगर परिसरात उघडकीस आला.

पोलिस शिपाई आर. बी. गोडांबे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. सागर सचदेव मेश्राम (३५, रा. गुजरनगर, थेरगाव) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतः च्या नावाने आरबीएल बँकेत खाते उघडले.

त्यानंतर साथीदारांशी संगनमत करून त्या खात्यातून तब्बल नऊ लाख २३ हजार ९६५ रुपयांचे व्यवहार करण्यात आले. या खात्याचा वापर करून देशभरातील १० नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

संघटित टोळीकडून सात नागरिकांची १२ लाखांची फसवणूक

बँक खाते उघडून संघटित गुन्हेगारीच्या उद्देशाने त्याचा वापर करत देशभरातील सात नागरिकांची १२ लाख रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जानेवारी ते ३० जून २०२६ या कालावधीत भोसरी गावातील लांडेवाडी चौक परिसरात उघडकीस आला.

महिला पोलीस शिपाई पूजा चव्हाण यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिवकुमार अमोलराव धोटे (रा. मोर्शी ग्रामीण, अमरावती) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने साथीदारांसह कट रचून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते उघडले. या खात्याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत देशभरातील सात नागरिकांची १२ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास भोसरी पोलिस करीत आहेत.

बनावट बँक खात्याद्वारे सहा नागरिकांची फसवणूक

बँक खात्याचा गैरवापर करून देशभरातील सहा नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका खातेधारकासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १ जानेवारी ते ३१ एप्रिल २०२६ या कालावधीत बावधन परिसरात उघडकीस आला.

महिला पोलिस शिपाई कावेरी बांगर यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रीकांत कैलास राठोड (रा. बाटेवस्तीजवळ, तळवडे, मूळ- भाडेगाव, यवतमाळ) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते उघडून साथीदारांशी संगनमत केले. या खात्यावर तब्बल ६४ लाख ६५ हजार २३५ रुपयांचे व्यवहार करण्यात आले. त्याच खात्याच्या माध्यमातून देशभरातील सहा नागरिकांची एक लाख एक हजार ४७८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बावधन पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT