पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांची वाहतूक धोकादायक पद्धतीने होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तीन प्रवाशांसाठी परवानगी असलेल्या रिक्षांमध्ये सहा ते आठ, तर काही ठिकाणी त्याहून अधिक कामगारांना बसवून वाहतूक केली जात आहे. यामुळे कामगारांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होत असून वाहतूक नियमांचा उघडपणे भंग होत असल्याचे दिसून येत आहे.
भोसरी, तळवडे, चिखली, आकुर्डी, एमआयडीसी आणि इतर औद्योगिक भागांमध्ये अशा रिक्षा मोठ्या प्रमाणात धावताना दिसतात. काही कामगार रिक्षेच्या दोन्ही बाजूंना लटकून प्रवास करतात, तर अनेक जण क्षमतेपेक्षा जास्त संख्येने बसल्यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थितीत प्रवास करत असल्याचे चित्र आहे. एखाद्या अपघाताच्या वेळी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिक सांगतात, ही परिस्थिती अनेक दिवसांपासून सुरू आहे. रस्त्यावर उघडपणे नियमांचे उल्लंघन होत असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. कामगारांचे म्हणणे आहे की, स्वस्त आणि सहज उपलब्ध वाहतुकीचा पर्याय म्हणून अनेकजण रिक्षांचा वापर करतात. मात्र काही रिक्षाचालक अधिक प्रवासी घेऊन आर्थिक फायदा मिळविण्याच्या प्रयत्नात प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करत आहेत.
वाहतूक नियम फक्त कागदावरच आहेत का? औद्योगिक भागात रोज क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावणाऱ्या रिक्षांवर सातत्याने कारवाई का होत नाही? वाहतूक पोलिसांनी एमआयडीसी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.स्वप्निल घाडगे अभियंता
औद्योगिक परिसरात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर नियमित कारवाई केली जाते. अशा प्रकारांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अशा वाहनांमध्ये प्रवास टाळून वाहतूक नियमांचे पालन करण्यास सहकार्य करावे.अमित डोळस वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकारी