Gun Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Arms License: पिंपरी-चिंचवडमध्ये शस्त्र परवान्यांवर मोठी कारवाई; १५ परवाने रद्द, ६८ अर्ज नामंजूर

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा कठोर आढावा; परवान्यांचा गैरवापर आणि पार्श्वभूमी तपासणीमुळे शहरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील शस्त्र परवान्यांचा व्यापक आढावा घेण्यास पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सुरुवात केली असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच नव्याने शस्त्र परवाना मिळावा यासाठी दाखल झालेले तब्बल ६८ अर्जही नामंजूर करण्यात आले आहेत. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून प्रतिष्ठा आणि स्टेट्स सिम्बॉल म्हणून शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र आता परवान्याची आवश्यकता, परवानाधारकांची पार्श्वभूमी, नियमांचे पालन आणि शस्त्राचा वापर यांची सखोल तपासणी सुरू झाल्याने परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर शहराच्या झपाट्याने झालेल्या विस्तारासोबत शस्त्र परवान्यांची संख्याही वाढली. उद्योगपती, बिल्डर, व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी तसेच प्रभावशाली व्यक्तींमध्ये शस्त्र परवाना घेण्याची चढाओढ सुरू झाली. स्वसंरक्षण हे अधिकृत कारण असले तरी अनेकांकडे शस्त्र परवाना हा प्रतिष्ठेचा भाग म्हणून पाहिला जाऊ लागला. आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या सुमारे १,४०० च्या आसपास शस्त्र परवानाधारक असल्याची सूत्रांनी माहिती दिली.

दरम्यान, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शस्त्र परवान्यांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नव्या परवान्यांना मंजुरी देताना त्यांनी आवश्यकतेचा निकष कडक केला. परिणामी त्यांच्या कार्यकाळात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नवे परवाने मंजूर झाले आहेत. त्यामध्येही प्रामुख्याने स्पोर्ट्स कोट्यातील नेमबाज किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याचबरोबर प्रथमच विद्यमान शस्त्र परवान्यांची व्यापक फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे. परवानाधारकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांच्यावर दाखल गुन्हे, शस्त्र वापरण्याची आवश्यकता आणि नियमांचे पालन याची पडताळणी केली जात आहे. या तपासणीत नियमभंग, शस्त्राचा गैरवापर अथवा अन्य कारणे आढळून आल्याने १५ परवाने रद्द करण्यात आले आहेत.

रद्द करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये काही व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे आढळले. काहींकडून शस्त्राचा गैरवापर झाल्याची नोंद समोर आली. काही प्रकरणांमध्ये शस्त्र खरेदीसाठी मंजुरी मिळाल्यानंतरही विहित मुदतीत शस्त्र खरेदी करण्यात आले नव्हते. तर काही परवाने धारकांच्या मृत्यू, वृद्धत्व किंवा अन्य प्रशासकीय कारणांमुळेही परवाने रद्द करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटीस बजावून त्यांची बाजू ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला.

शस्त्र परवान्यांचा आढावा घेत असतानाच नव्या परवान्यांसाठी आलेल्या अर्जांचीही बारकाईने छाननी करण्यात आली. यामध्ये तब्बल ६८ अर्जदारांकडे शस्त्र बाळगण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याचे निदर्शनास आले. केवळ प्रतिष्ठा, व्यवसाय किंवा सामाजिक प्रभाव हे कारण पुरेसे नसल्याचे स्पष्ट करत हे सर्व अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

रद्द परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू

परवाना रद्द झाल्यानंतर संबंधितांनी आपल्याकडील शस्त्र तातडीने पोलिसांच्या ताब्यात जमा करणे बंधनकारक असते. त्यानुसार, स्थानिक पोलिस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या असून शस्त्रे जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींनी शस्त्रे जमा केली असली तरी काही प्रकरणांमध्ये अद्याप पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदेशानंतरही शस्त्र स्वतःकडे ठेवणे बेकायदा ठरू शकते. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते.

शस्त्र परवाना ; मोठी जबाबदारी

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्र परवाना व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा पोलिस आयुक्तालयाचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शस्त्र परवाना म्हणजे अधिकार किंवा प्रतिष्ठेचे प्रदर्शन नसून ती एक गंभीर जबाबदारी असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. त्यामुळे केवळ स्टेटस् सिम्बॉल म्हणून पिस्तूल बाळगणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

परवानाधारकांवरही करडी नजर

पोलिस आयुक्त चौबे यांनी सुरू केलेला हा आढावा पुढेही सुरू राहण्याची शक्यता असून परवानाधारकांच्या हालचाली, त्यांच्यावरील गुन्हे, शस्त्र वापर आणि नियमांचे पालन यावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांची पिस्तुले आणि बंदुका थेट सरकारजमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शस्त्र परवान्यांबाबतची सद्यस्थिती

  • आयुक्तालय हद्दीत सुमारे १,४०० परवानाधारक

  • १५ शस्त्र परवाने रद्द

  • नव्या परवान्यासाठीचे ६८ अर्ज नामंजूर

  • रद्द परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू

  • परवानाधारकांच्या पार्श्वभूमीची फेरतपासणी सुरू

शस्त्र परवाना हा केवळ प्रतिष्ठेचा विषय नसून जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळे भविष्यातही शस्त्र परवान्यांच्या बाबतीत नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. गैरवापर अथवा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT