Pimpri Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Police: अमली पदार्थांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी मोहीम; ४५ हजार नागरिकांमध्ये जनजागृती

'एक्स'च्या माध्यमातून ४५ हजार नागरिकांमध्ये जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: अमली पदार्थांचे वाढते संकट रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, संशयास्पद हालचाली अथवा अमली पदार्थांबाबत माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने केले आहे.

अमली पदार्थमुक्त पिंपरी-चिंचवड मोहिमेअंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल टाऊन हॉल उपक्रमातून सुमारे ४५ हजार नागरिकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्' या संकल्पनेच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. मंगळवारी (दि. २८) सकाळी ११ ते ११.३० या वेळेत ‘एक्स’च्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.

या उपक्रमात पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, औद्योगिक समूह, गृहनिर्माण सोसायट्या, डॉक्टर व मेडिकल असोसिएशन, हॉटेल व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक मंडळे अशा एकूण ५८१ समूहांतील विद्यार्थी, नागरिक व कर्मचारी सहभागी झाले होते.

अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनापासून बचावाचे उपाय, संशयास्पद हालचाली आढळल्यास काय करावे आणि तक्रार कशी द्यावी, याबाबत नागरिकांनी प्रश्न विचारले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देत अमली पदार्थांविरोधातील लढ्यात नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळी अँटी नार्कोटिक्स हेल्पलाईन क्रमांक ७७९८१००११२ सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. अमली पदार्थांची विक्री, साठा किंवा सेवनाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड तसेच सर्व पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहभागी झाले होते. उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT