पिंपरी: वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘गोल्डन अवर’ रस्त्यावरच खर्ची पडत असल्याने रुग्णांच्या जीविताचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. वाढती वाहनसंख्या आणि अपुरी वाहतूक शिस्त यामुळे आपत्कालीन सेवांचा वेग मंदावला असून, यावर ठोस उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत शहरातील रुग्णवाहिका खरोखरच वेळेत रुग्णालय गाठू शकतात का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांमध्ये जागृतीचा अभाव
वाहतूक नियमांनुसार रुग्णवाहिकेला प्राधान्य देणे बंधनकारक असले तरी अनेक वाहनचालक सायरनकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. काही जण कानात इअरफोन लावून वाहन चालवतात. तर, काही जण रुग्णवाहिकेच्या मागे जागा मिळवण्यासाठी धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचेही दिसून येते. ज्यामुळे पुन्हा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही मिनिटांचा उशीर पडू शकतो महागात
हृदयविकाराच्या झटक्यात प्रत्येक मिनिटाला हृदयाच्या पेशींचे नुकसान वाढते. ब्रेन स्ट्रोकमध्ये उपचाराला उशीर झाल्यास कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका वाढतो. तर, गंभीर अपघातातील रक्तस्राव असलेल्या रुग्णासाठी वेळेवर उपचारच जीवन-मृत्यूचा फरक ठरू शकतात. त्यामुळे रुग्णवाहिकेला दिलेला मार्ग हा केवळ वाहतूक शिस्तीचा भाग नसूनख एक सामाजिक कर्तव्य आहे. शहरातील काही प्रमुख चौकांमध्ये रुग्णवाहिका सायरन वाजवत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतानाही वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतात. काही वाहनचालक बाजूला सरकत असले तरी रस्त्यावरील अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेचा वेग मंदावतो.
या उपाययोजनांची गरज
प्रमुख चौकांमध्ये स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल प्रणाली
रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र इमर्जन्सी लेन
बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई
वाहनचालकांमध्ये जनजागृती मोहीम
अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणे
वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नियुक्ती बेशिस्त पार्किंगमुळे कोंडीत भर
शहरातील वाढती वाहतूककोंडी आता केवळ नागरिकांच्या वेळेचाच नाही, तर थेट जीविताचाही प्रश्न बनू लागली आहे. अपघात, हृदयविकाराचा झटका, गंभीर आजार किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. वैद्यकीय भाषेत महत्त्वाचा मानला जाणारा गोल्डन अवर वाचवण्यासाठी रुग्णवाहिका वेगाने रुग्णालयात पोहोचणे गरजेचे असते. मात्र, शहरातील प्रमुख चौक, अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे रुग्णवाहिका अनेकदा वाहतूक कोंडीत अडकताना दिसत आहेत.
अतिक्रमणामुळे परिस्थिती गंभीर
शहरातील मुंबई-पुणे महामार्ग, भोसरी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, दापोडी, सांगवी, हिंजवडी तसेच बीआरटी मार्गांलगतच्या चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सायरन वाजवत धावणाऱ्या रुग्णवाहिकेलाही मार्ग मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी वाहनचालक रुग्णवाहिकेला जागा देण्याचा प्रयत्न करत असले तरी अरुंद रस्ते आणि अतिक्रमणामुळे परिस्थिती गंभीर बनत आहे.
गोल्डन अवर म्हणजे काय ?
अपघात किंवा गंभीर वैद्यकीय परिस्थितीनंतरचा पहिला एक तास हा रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीत उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे हा अमूल्य वेळ रस्त्यावरच वाया जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.
सायरन ऐकू येतोय; पण रस्ता मोकळा होतोय का ?
रुग्णवाहिकेचा सायरन म्हणजे कोणाच्या तरी जीवासाठी सुरू असलेली वेळेशी शर्यत. मात्र, अनेकदा सायरन ऐकूनही काही वाहनचालक रस्ता मोकळा करण्याऐवजी जागेवरच थांबतात किंवा रुग्णवाहिकेच्या मागे वाहन घालून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक नागरिकाने रुग्णवाहिकेला तत्काळ मार्ग दिल्यास काही मिनिटे वाचू शकतात आणि तीच मिनिटे एखाद्या रुग्णासाठी जीवनदान ठरू शकतात.
ग्रीन कॉरिडॉरची गरज
गंभीर रुग्णांसाठी वाहतूक पोलिसांकडून काही वेळा ग्रीन कॉरिडॉर किवा संजीवनी मूव्हमेंट तयार केला जातो. मात्र, दैनंदिन आपत्कालीन सेवांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात स्वतंत्र आपत्कालीन मार्ग, स्मार्ट सिग्नल व्यवस्था आणि अतिक्रमणमुक्त रस्ते आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.