AI Traffic Management Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad AI Traffic Signals: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी फुटणार? आता AI सिग्नलद्वारे वाहतुकीचे नियंत्रण

मोशीतील गावठाण आणि भारतमाता चौकात एटीसीएस यंत्रणेची प्रायोगिक चाचणी; यशस्वी झाल्यास संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. शहरातील कोंडीच्या चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सिग्नलवर अनुकूली वाहतूक नियंत्रण प्रणाली (अडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम यंत्रणा अर्थात एटीसीएस) बसविण्यात येणार आहे. यासाठी मोशीतील वाहतूक कोंडीच्या दोन चौकांत एटीसीएस यंत्रणा बसवून पंधरा दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली जाणार आहे.

शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात तब्बल 30 लाख 754 वाहने असल्याचा महापालिकेच्या सन 2025-26 या पर्यावरण सध्यःस्थिती अहवालात दावा करण्यात आला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

शहरात 12 फुटांपासून 80 फूट रूंदीचे पक्के, कच्चे असे दोन हजार 73 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध रस्त्यांवर 154 चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणा असतानाही वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोंडीच्या चौकातील सिग्नल यंत्रणा एआय आधारित अडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे विद्युत विभागाला निर्देश दिले आहेत.

त्यानुसार विद्युत विभाग पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडीच्या मोशी गावठाण व भारतमाता या दोन चौकात एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून पुढील पंधरा दिवसात अडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम यंत्रणा बसविणार आहे. याची सात दिवस चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कशा पध्दतीने कमी झाली, याचा अभ्यास केला जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व चौकात टप्प्या-टप्प्याने ही यंत्रणा बसविण्यात येईल. यासाठी यापूर्वीच विविध चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेने सांगितले.

संपूर्ण शहरात एआय यंत्रणेवरील सिग्नल उभारणार

शहरात वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. गर्दीच्या रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी एटीसीएस यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरत आहे. ही यंत्रणा नागपूरसह विविध शहरात सुरू आहे. या यंत्रणेमुळे गर्दीची ठिकाणे व वेळेचा अभ्यास करत सिग्नल यंत्रणेचा वेळ कमी-अधिक केला जाऊ शकतो. यामुळे वाहतूक कोंडी कमी करता येऊ शकणार आहे. मोशीतील गर्दीच्या दोन चौकात पंधरा दिवसात एटीसीएस यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता महेश कावळे यांनी दिली.

एटीसीएस म्हणजे काय?

एटीसीएस ही एक ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली आहे. ज्यात ट्रॅफिक सिग्नलची वेळ वास्तविक ट्रॅफिक मागणीनुसार बदलते किंवा जुळवून घेते. ट्रॅफिक सिग्नल हे आधीच ठरवलेल्या वेळेनुसार चालतात, ज्यामुळे रस्ता रिकामा असतानाही वाहनांना लाल सिग्नलवर थांबावे लागते. मात्र, एटीसीएस यंत्रणा रस्त्यावरील वाहनांची संख्या व गर्दीचा थेट अंदाज घेऊन सिग्नलची वेळ स्वतःहून बदलू शकते. त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

शहरातील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे

रावेत येथील मुकाई चौक, भोसरी येथील गोडाऊन चौक, फिनोलेक्स चौक, भारत माता चौक, खंडोबा माळ चौक, बोर्‍हाडेवस्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, नाशिक फाटा, लक्ष्मी चौक, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, वाकड येथील भुजबळ चौक, ताथवडे अंडरपास, काळाखडक रस्त, तळवडे चौक, भूमकर चौक, फिनिक्स मॉल परिसर, पिंपळे गुरवमधील काशिद पार्क, भोसरी बस स्थानक, पुनावळे ब्रीज अंडरपास, चिखली चौक, देहू फाटा, टिळक उड्डाण पूल, दापोडी मेट्रो स्टेशन, गणेशनगर चौक, डांगे चौक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT