मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात विद्युत दिव्याच्या खांबांवर रंगीबेरंगी किऑक्स, रस्त्यांवरील गॅण्ट्री (दिशादर्शक लोखंडी कमान) तसेच, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गात असंख्य जाहिराती लावल्या जातात. त्या जाहिरातीबाबतचे अद्याप निश्चित धोरण नसल्याने महापालिकेस त्यातून काहीच उत्पन्न मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. राजकीय नेते, पदाधिकारी, नगरसेवक, बांधकाम व्यावसायिक व इतर मंडळी त्या ठिकाणी फुकटची जाहिरात लावून आपली प्रसिद्धी तसेच, व्यावसायिक हेतू साध्य करून घेत आहेत. मात्र, धोरण ठरत नसल्याने तसेच, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे महापालिकेची झोळी रिकामीच आहे.
पिंपरी-चिंचवड शहर 181 किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहे. शहरात महापालिकेची तब्बल 1 लाख 14 हजार 462 विद्युत दिव्यांचे खांब आहेत. त्यातील अनेक खांबांवर किऑक्स लावून बिनभोबाट जाहिराती केल्या जात आहेत. त्याला महापालिका प्रशासनाकडून कसलाही लगाम नाही. शेकडो खांबांवर किऑक्स लावून बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, क्लासेस आपली फुकटची जाहिरात करून घेतात. अशा प्रकारे किऑक्स लावण्यासाठी ठराविक जाहिरात एजन्सी शहरात कार्यरत आहेत. त्यातून महापालिकेस कोणतेही शुल्क मिळत नाही. ते सर्व उत्पन्न खासगी एजन्सीच्या खिशात जात आहे. किऑक्स लावण्यानंतर अनेक दिवसांनंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, तोपर्यंत त्याच्या जाहिरातीचा हेतू साध्य झालेला असतो.
याच प्रकारे शहरातील मुख्य रस्त्यांवरील गॅण्टीवर फुटकची जाहिरात केली जात आहे. त्यावर विशेष करून राजकीय पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्याच्या जाहिरातीचे प्रमाण अधिक असते. वाढदिवस, सण, उत्सव, स्पर्धा, महापुरुषांच्या जयंतीनिमित्तचे फ्लेक्स त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लावले जातात. मात्र, त्या जाहिरातीतूनही महापालिकेस काहीच उत्पन्न मिळत नाही. शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर एकूण 97 गॅन्ट्री आहेत.
शहरात महापालिकेच्या असंख्य उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग आहेत. त्याची संख्या 80 आहे. तेथे जाहिरात लावण्याबाबत महापालिकेचे अद्याप कोणतेही धोरण नाही. त्यामुळे तेथे शेकडो जाहिराती लावल्या जातात. जाहिरात एजन्सी, नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी फुकटच्या जाहिराती लावत आहेत. त्या माध्यमातूनही महापालिकेसही काहीच तिजोरीत काहीच भर पडत नाही.
या सर्व प्रकारामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, खासगी जाहिराती एजन्सी, बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संख्या, राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते फुकटची जाहिरातबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्या बाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे.
निविदाप्रकियेस वारंवार रेड सिग्नल
विद्युत खांबांवर किऑक्स लावणे. रस्त्यावरील गॅन्ट्रीवर जाहिराती लावणे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गात जाहिरात लावणे यासाठी महापालिकेकडून निविदाप्रक्रिया राबविण्यास चालढकल केली जात आहे. प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याने तसेच, निविदाप्रक्रियेत वारंवार त्रुटी काढल्या जात असल्याने ती निविदाप्रक्रिया अनेक वर्षांपासून अडकून पडली आहे. परिणामी, महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
बस थांबे, डीपी बॉक्सवरही जाहिरातबाजी
शहरातील बसथांबे, डीपी बॉक्स, सीमाभिंती, प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक, झाडांवर विनापरवाना पोस्टर लावण्यात येतात. त्यात जागा विक्री, नोकरीविषयक, वैद्यकीय उपचार, सदनिका भाड्याने देणे, क्लासेस, संगणक प्रशिक्षण, अभ्यासक्रम, सर्कस, चित्रपट, सेवा आदी संदर्भातील जाहिराती असतात. त्या पोस्टरमुळे शहर विद्रुप दिसते. कश्याही प्रकारे पोस्टर चिकटवल्याने स्वच्छता वाढते. अशी पोस्टर लावण्यावर ठोस कारवाई होत नसल्याने विनापरवाना पोस्टर लावण्याची संख्या काही कमी होत नसल्याचे चित्र आहे.
स्थायी समितीच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष कार्यवाही
विद्युत खांबांवर किऑक्स लावणे. रस्त्यावरील गॅण्ट्रीवर जाहिराती लावणे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गात जाहिरात लावणे यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयानुसार निविदाप्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्याला जाहिरात एजन्सींची प्रतिसाद मिळाला आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर त्यासंदर्भातील प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल. त्यातून महापालिकेस दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळणार आहे. तसेच, शहरभरात विनापरवाना लावण्यात येणार्या जाहिराती, फ्लेक्स, किऑक्सवर नियमितपणे कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.