मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून सुमारे एक हजार एमएलडी सांडपाणी तयार होते. मात्र, त्यापैकी केवळ सरासरी ४०० एमएलडी सांडपाण्यावर महापालिकेकडून प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित ६०० एमएलडी सांडपाणी ड्रेनेजलाईन, नाल्यामार्फत थेट पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीत सोडले जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, नद्या अधिक प्रदूषित होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचे पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रात कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले एसटीपी शोभेचे ठरत आहेत.
महापालिकेकडून पवना नदीतून दररोज ५२० एमएलडी पाणी घेऊन ते शुद्ध करून शहराला पुरवले जाते. तसेच, एमआयडीसीकडून दररोज ३० एमएलडी शुद्ध पाणी विकत घेतले जाते. ते पाणी एमआयडीसी पवना नदीतूनच उचलते. आंद्रा पाणी योजनेतून दररोज ९० एमएलडी पाणी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील बंधार्यातून उचलले जाते. तर, मुळा नदीतून महाापालिका पाणी उचलत नाही. महापालिका असे दररोज एकूण ६४० एमएलडी पाणी संपूर्ण शहराला पुरवत आहे. तसेच, काही नागरिक, हाऊसिंग सोसायट्या, बंगलोधारक बोअरींग, विहीर, खासगी टँकर तसेच, पुर्नवापर केलेले पाण्याचा वापर करतात. एमआयडीसीकडून औद्योगिक पट्ट्यातही पाणीपुरवठा केला जातो. अशा प्रकारे शहरात एकूण 1 हजार एमएलडी पाणी दररोज शहवासीयांकडून वापरले जात आहे. त्यातून तितकेच घरगुती तसेच, औद्योगिक सांडपाणी तयार होते.
महापालिकेचे शहरभरात एकूण ४२३ एमएलडी क्षमतेचे एकूण २२ मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) आहेत. त्यातून दररोज सरासरी ४०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होते, असा दावा महापालिकेने केला आहे. काही मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांकडून त्यांच्या एसटीपीद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, ते प्रमाण खूपच नगण्य आहे. महापालिकेच्या आकडेवारीमुळे तब्बल ६०० एमएलडी घरगुती तसेच, रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न होताच नदी पात्रात मिसळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, किवळे, सीएमई यासह अनेक भागांत महापालिकेचे एसटीपी अस्तित्वात नाहीत. त्यामुळे त्या भागांतील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही भागांत ड्रेनेजलाईन फुटल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून सांडपाणी नाले, कच्च्या रस्त्यामार्फत थेट नदीपात्रात मिसळते. काही उद्योग, वर्कशॉपने थेट ड्रेनेजलाईनला रासायनिक सांडपाण्याच्या वाहिन्या जोडल्याचे प्रकार मागे समोर आले होते. नदीकाठावरील काही ड्रेनेजलाईन जाणीवपूर्वक फोडल्या जात असल्याच्या तक्रारी कायम आहेत. तसेच, महापालिकेच्या एसटीपीतून प्रक्रिया न केलेले सांडपाणी रात्रीच्या वेळेत थेट नदीत सोडले जात असल्याच्या आरोपही होतात.
त्या सर्व कारणांमुळे नदी पात्रात प्रक्रिया न केलेले सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याचे स्पष्ट होत आहे. पात्रात जलपर्णी फोफावण्याचे ते एक मुख्य कारण असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. परिणामी, नदी प्रदूषणात भर पडत आहे. नदीचे पाणी काळपट झाले असून, त्यातून प्रचंड दुर्गंधी येते. नदीकाठच्या रहिवाशांना वर्षभर डासांच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागतो. शहरातील काही भागात पात्रात पांढरा फेस तयार होणे. मासे मृत पावणे असे प्रकार वारंवार समोर येत आहेत.
सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्याने महापालिकेस दंड
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून पवना व आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी दिले जाते. दररोज एकूण ६४० एमएलडी पाणी महापालिका वापरते. जितके पाणी घेतले जाते, तितके पाणी प्रक्रिया करून नदी पात्रात सोडण्याची अट आहे. तसे न केल्यास पाणी दराच्या चौपट दंड केला जातो. महापालिकेकडून सरासरी ४०० एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून महापालिकेस दरवर्षी सुमारे १० कोटी रुपयांचा दंड आकारला जात आहे.
पाच नवीन एसटीपी उभारण्याचे नियोजन
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन एकूण १७५ एमएलडी क्षमतेचे ५ एसटीपी बांधण्याचे नियोजन आहे. एकूण ३८२.६० किलोमीटर अंतराचे ड्रेनेजलाईन टाकली जाणार आहे. तर, ६६.३० किलोमीटर अंतराचे नाल्यांमधील ड्रेनेजलाईन बाहेरून टाकली जाणार आहे. त्यासाठी १ हजार ९२ कोटी ८२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी बांधण्यात येणार आहे. सद्यस्थितीत एकूण २२ एसटीपीतून ४०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्या एसटीपीची क्षमताही वाढवली जात आहे. तेथे प्रकिया केलेले सुमारे ८० एमएलडी पाणी विविध उद्याने व औद्योगिक कंपन्यांना वापरासाठी दिले जाते. महापालिका १०० एमएलडी क्षमतेचा पुनर्वापर, पुनर्चक्रिकरण प्रकल्प उभारणार आहे. शहरातील मोठ्या ३५० पेक्षा अधिक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये स्वत:चे एसटीपी सुरू आहेत, असे महापालिकेचे सहशहर अभियंता विनय ओहोळ यांनी सांगितले.
पालिकेकडून केला जाणार पाणीपुरवठा: ६४० एमएलडी
बोअरींग, विहीर, खासगी टँकर, एमआयडीचे वापरले जाणारे पाणी: ३६० एमएलडी
दररोज तयार होणारे सांडपाणी: एक हजार एमएलडी
सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जाणारे: ४०० एमएलडी
प्रक्रिया न करता थेट नदीत मिसळणारे सांडपाणी: ६०० एमएलडी