पिंपरी: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या सहा वर्षीय मुलाला आईने तिच्या प्रियकरासोबत कट रचून ठार केले. या गुन्ह्यात आरोपी असलेला फरार प्रियकर राम विनायक कजेवाडी (रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. पूस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याला दक्षिण महाळुंगे पोलिसांनी आंध प्रदेश आणि अंबाजोगाई येथे पाठलाग करून शुक्रवार (दि. 17) अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून शनिवारी (दि. 4) रात्री साडेअकराच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी (ता. खेड) येथे सहा वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या केली होती. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा बनाव करण्यात आला होता.
आवेज मेहबूब शेख (वय 6) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक शेख (49, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी बसरिन मेहबूब शेख (27, रा. मु. पो. पूस, ता. अंबाजोगाई, बीड) हिला अटक केली असून, तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार होता.
बसरिन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय आवेज हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी शनिवारी रात्री त्याला बाथरूममध्ये नेले. त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून ठार केले. त्यानंतर मृतदेह धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला; मात्र, यामध्ये नातेवाईकांना संशय आला.
नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग््राामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. आवेज याचा मृत्यू हृदयाच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडवून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आवेजच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. पुढे परळी ग््राामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिला. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी बुधवार गुन्ह्याची नोंद केली. त्यानुसार, फरार आरोपीचा तपास घेत असताना तिरुपती आंध प्रदेश आणि बीड या ठिकाणी त्याचा पाठलाग करून आरोपीस अटक केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.