

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मालमत्ताकर 30 जूनपर्यंत भरल्यास सामान्यकरात सवलत दिली जाणार आहे. या सवलत योजनेंतर्गत नागरिकांना एकूण 16 प्रकारच्या सवलतींचा लाभ मिळणार आहे. मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सन 2026-26 या चालू वर्षाच्या सामान्यकरावर 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. ऑनलाइन माध्यमातून मालमत्ताकर भरणाऱ्या करदात्यांना अतिरिक्त 5 टक्के सवलत आहे. ही योजना 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा आहे. नागरिकांना घरबसल्या कर भरणा करता येत असून, वेळेची बचत होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आगाऊ मालमत्ताकर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहे. त्या सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 30 जूनपूर्वी कर भरणा करावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
..या आहेत प्रमुख सवलती
30 जूनअखेर मालमत्ताकराची रक्कम भरल्यास 5 टक्के सामान्यकरात सूट
ऑनलाइन स्वरूपात कराचा भरणा केल्यास 5 टक्के सामान्य करात सूट
फक्त महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी मालमत्तेच्या सामान्यकरावर तब्बल 30 टक्के सामान्यकरात सूट
दिव्यांग व्यक्तीच्या एका मालमत्तेच्या सामान्यकरावर 50 टक्के सामान्य करात सूट
स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेवर 50 टक्के सामान्यकरात सूट
हाऊसिंग सोसायटीच्या आवारात कंपोस्टिंग यंत्रणा सुरू असल्यास 5 टक्के सामान्यकरात सूट
एसटीपी प्लांट सुरू असल्यास 3 टक्के सामान्यकरात सूट
कंपोस्टिंग यंत्रणा व एसटीपी प्लांट सुरू असल्यास 8 टक्के सामान्यकरात सूट
झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास 8 टक्के सामान्यकरात सूट
झिरो वेस्ट व एसटीपी प्लांट सुरू असल्यास 10 टक्के सामान्यकरात सूट
शैक्षणिक इमारतींना कंपोस्टिंगसाठी 4 टक्के, झिरो वेस्टसाठी 4 टक्के, झिरोवेस्ट व रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी 8 टक्के, झिरोवेस्ट व सौर ऊर्जेसाठी 9 टक्के, झिरोवेस्ट, रेनवॉटर हार्वेस्टिंग व सौर ऊर्जेसाठी 10 टक्के सूट
करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी निश्चित कालावधीत कर भरणा करणे आवश्यक आहे. वेळेत कर भरल्यामुळे आर्थिक सवलत मिळण्यासोबतच शहरातील सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ताकर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.