पिंपरी: नवीन खरेदी केलेल्या आलिशान कारची रील्स बनविण्याच्या नादात मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहने अडवून धोकादायक पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले. या 'रील्सबाजी'मुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या. हा प्रकार गुरुवार (दि. २७) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास बाणेर ते वाकड येथील भुजबळ चौकादरम्यान घडला. याप्रकरणी बावधन पोलिसांनी कारमालक, फोटोग्राफर आणि वाहनचालकांसह इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ अशोक केदारी (३२, रा. कुसगाव, ता. मावळ), फॉर्च्युनर कारवरील चालक, फोटोग्राफर सोहम चव्हाण, दुसऱ्या फॉर्च्युनर कारवरील चालक तसेच अन्य वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सूरज टिळेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ केदारी यांनी २७ ऑगस्ट रोजी महिंद्रा कंपनीची नवीन कार खरेदी केली. या कारच्या रील्स आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी फॉर्च्युनरसह अन्य वाहने महामार्गावर आणण्यात आली. चित्रीकरणासाठी वाहने रस्त्यावर एकत्रितपणे उभी करण्यात आली. काही वाहने रस्त्यात थांबविण्यात आली, तर काही वाहने एकमेकांच्या समांतर आणि अगदी जवळून चालविण्यात आली.
आरोपींनी रील तयार करण्यासाठी वाहनांचा वेग अचानक कमी करणे, वाहने थांबविणे तसेच एकत्रितपणे धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्याचे प्रकार केले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली. वाहनांची आडवी रांग लावल्याने महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच इतर वाहनचालकांच्या जीवितास आणि सुरक्षिततेसही धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन व ड्रोनसदृश कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश लागू आहे. असे असतानाही फोटोग्राफर सोहम चव्हाण याने चित्रीकरण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५, २८१, २२३, ३(५) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलिस तपास करीत आहेत.