पिंपरी: बेकायदेशीररित्या गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून 20 हजार 600 रुपये किमतीचा 406 ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 14) दुपारी दळवीनगर झोपडपट्टी, पत्राशेड, म्हसोबा मंदिराजवळ करण्यात आली.
याप्रकरणी पोलिस शिपाई संतोष बिभीषण सपकळ यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी प्रकाश तुकाराम शिंगे (35, रा. ओटा स्कीम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश शिंगे याने 20 हजार 600 रुपये किमतीचा 406 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी आणला होता. चौकशीत त्याने हा माल ओटा स्कीम येथील सपना साठे नावाच्या महिलेकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. निगडी पोलिस तपास करीत आहेत.
सामान शिफ्टिंग करणाऱ्या कामगारांना मारहाण
सामान शिफ्टिंगचे काम करत असलेल्या कामगारांना चौघांच्या टोळक्याने शिवीगाळ करत लाकडी बांबूने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ग्लोरिया आयटी पार्क येथे घडली.
या प्रकरणात सचिन पांडुरंग पिटले (33, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, पुणे; मूळ गाव परभणी) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी लालमतकुमार भोडेला आदिवासी, संजीवकुमार श्रीरामप्रसाद तिवारी, अनुज पवन मिश्रा आणि अनिलकुमार रामप्रकाश मिश्रा (सर्व रा. ग्लोरिया आयटी पार्क, बावधन, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ग्लोरिया आयटी पार्क येथे सामान शिफ्टिंगचे काम करत असताना आरोपींनी त्यांना विनाकारण शिवीगाळ केली. त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, मागून येऊन लाकडी बांबूने फिर्यादी तसेच त्यांचे सहकारी सिद्धार्थ सोनवणे व अभिषेक फासगे यांच्या डोक्यात, पाठीवर आणि हातावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. बावधन पोलिस तपास करीत आहेत.