Pimpri Businessman Kidnapping Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Businessman Kidnapping: ‘यूपी पोलिस’ बनून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाखांची खंडणी

१०० किमी पाठलाग करून संगमनेरमध्ये चार आरोपी अटकेत, व्यापाऱ्याची सुखरूप सुटका

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: ‘यूपी पोलिस’ असल्याचे भासवत चार जणांनी मिळून व्यापाऱ्याचे अपहरण करत भावाकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना रहाटणी येथील शिवराजनगर परिसरात घडली. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल १०० किलोमीटर पाठलाग करून संगमनेर येथे चारही आरोपींना जेरबंद करत जैसवानी यांची सुखरूप सुटका केली आहे. सुरेशकुमार बाबूमल जैसवानी (रा.रहाटणी) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात व्यापारी सुरेशकुमार जैसवानी हे त्यांच्या कामानिमित्त बाहेर असताना चार संशयित त्यांच्या जवळ आले. त्यांनी स्वतःला ‘उत्तर प्रदेश पोलिस’ असल्याचे सांगत काही चौकशी करायची असल्याचे सांगितले. पोलिस असल्याचा धाक दाखवत आरोपींनी जैसवानी यांना गाडीत बसण्यास सांगितले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जैसवानी गोंधळून पळून जाऊ लागले. मात्र, एका आरोपीने त्यांच्या दुचाकीला धक्का देत खाली पाडले. त्यानंतर आरोपींनी त्यांना गाडीत जबरदस्ती बसवले.

या वेळी परिसरात काही नागरिक उपस्थित होते. मात्र आरोपी आपण पोलिस असल्याचे सांगत असल्याने कोणीही हस्तक्षेप केला नाही. आरोपींनी जैसवानी यांना कारमध्ये बसवून तेथून वेगाने पसार झाले.

दरम्यान, काही वेळातच आरोपींनी जैसवानी यांच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला फोन केला. त्यांनी जैसवानी यांचे अपहरण केल्याचे सांगत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर त्यांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. या फोननंतर कुटुंबीय घाबरले; मात्र त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत संपूर्ण माहिती दिली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू केला. जैसवानी यांच्या भावाला विश्वासात घेऊन आरोपींशी फोनवर संपर्क कायम ठेवण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. कॉल लोकेशनच्या आधारे आरोपी शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले.

तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत सुमारे १०० किलोमीटरचा पाठलाग केला. तपासादरम्यान आरोपी संगमनेर परिसरातून पुढे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत धाड टाकली आणि चारही आरोपींना ताब्यात घेत जैसवानी यांची सुखरूप सुटका केली.

प्राथमिक तपासात चारही आरोपी उत्तर प्रदेश येथील असल्याचे समोर आले असून त्यांनी खंडणीसाठी अपहरणाचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद

राहटणी परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणाची घटना कैद झाली आहे. संशयित आरोपी व्यापाऱ्याजवळ येऊन स्वतःला पोलिस असल्याचे सांगत त्यांच्याशी बोलताना दिसतात. काही क्षणांतच ते जैसवानी यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून तेथून निघून जात असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना तपासात मोठी मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT