Pimpri Bhimsrushti Ambedkar Jayanti Celebration Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Bhimsrushti Ambedkar Jayanti Celebration: पिंपरीतील भीमसृष्टीत भीमजयंतीला जनसागर; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

ढोल-ताशांच्या गजरात उत्सव; पुस्तक स्टॉल्स आणि वही-पेन संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी पिंपरीतील भीमसृष्टी परिसरात जनसागर लोटला होता. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण होते. मंगळवार (दि. 14) सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पिंपरी चौकात नागरिकांची गर्दी झाली होती. भीमसृष्टी परिसर सजविण्यात आला होता. सायंकाळी भीमसृष्टी परिसर रोषणाईने उजळून निघाला होता.

डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी शहर परिसरातून येणाऱ्या अनुयायांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत भीमसृष्टी परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे फलक लावण्यात आले होते. समाजबांधवांनी मोठ्या उत्साहात महामानवास अभिवादन केले. शहर परिसरातही विविध संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भीमसृष्टी परिसरात पुस्तकांचे स्टॉल्स्‌‍ लावण्यात आले होते. या स्टॉल्सवरही गर्दी दिसून आली.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत मानवंदना

पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत अनोखी मानवंदना देण्यात आली. आकाशातून होत असलेल्या या पुष्पवृष्टीमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिकांनी या अनोख्या मानवंदनेचा साक्षीदार होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन केले.

वही, पेन संकलन कक्ष

भारतीय बौद्धजन विकास समितीच्या वतीने वही-पेन संकलन कक्ष उभारण्यात आला होता. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार म्हणून वही, पेन देण्याचे आवाहन करण्यात येत होते. अनेकांनी स्वेच्छेने वही, पेन देऊन सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT