Arrested Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Crime: भक्ती-शक्ती चौकात संशयितांची बॅग उघडली अन् सहा गुन्ह्यांचा पर्दाफाश; ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडीचे साहित्य सापडताच पोलिसांची कसून चौकशी; दोन घरफोड्या आणि चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना भक्ती-शक्ती चौकात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांची बॅग तपासली असता घरफोडीचे साहित्य आढळून आले. त्यानंतर केलेल्या चौकशीत दोन घरफोड्या आणि चार दुचाकी चोरी अशा सहा गुन्ह्यांची उकल झाली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली असून, तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विकास ऊर्फ जंगल्या मिलिंद कांबळे (३५, रा. पिंपरी) आणि गौतम धर्मलिंगम नाडार (२८, रा. राजगुरुनगर, ता. खेड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी त्यांना काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सोमवारी (दि. २९) घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालत होते. भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष बॅगची झडती घेतली. त्यामध्ये मोठे स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, छन्नी आणि करवत असे घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य मिळून आले.

दोघांकडे कसून चौकशी केली असता काळेवाडी आणि मार्केट यार्ड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक घरफोडी, तसेच चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांतील दुचाकींसह एकूण तीन लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलिस उपनिरीक्षक कर्मराज गावडे तसेच पोलिस अंमलदार विजय शेळकंदे, मनोज राठोड, अजय डगले, उद्धव खेडकर, संदेश देशमुख, विजय जानराव आणि तेजस भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT