पिंपरी: बावधन परिसरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना नेहमीच्या पद्धतीने न जाता उलट्या दिशेने तपास करत गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 40 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे 21 लाख 66 हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली. आश्पाक ईसाक पठाण (32, रा. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार मुकुंद उद्धवराव हारदास (25, रा. पाटोदा (मावा), ता. परतूर, जि. जालना) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटना लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला अशा गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नांदे गावातून दोन मार्च रोजी स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट दोनकडे वर्ग करण्यात आला.
उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. नेहमीप्रमाणे दुचाकी चोरीनंतर आरोपी कुठे गेला, त्याने पुढे काय केले याचा तपास करण्याऐवजी पोलिसांनी उलट तपास करण्याची पद्धत अवलंबली. आरोपी घटनास्थळी कोणत्या मार्गाने आला, याचा मागोवा घेत त्या मार्गावरील सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली.
तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सात मार्च रोजी बालेवाडी परिसरातून आश्पाक ईसाक पठाण याला ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 21 लाख 66 हजार रुपये किमतीच्या 40 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यातील वाहन चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच चोरीच्या मोटारसायकली खरेदी करणारा मुकुंद उद्धवराव हारदास यालाही अटक करण्यात आली आहे.
या पथकाने केली कामगिरी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दीपक खरात, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दळे, नितीन ढोरजे, पोलिस हवालदार विक्रांत चव्हाण, विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, दीपक शिरसाट, पोलिस शिपाई प्रशांत सैद, सुखदेव गावंडे आणि रवि पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फायनान्सने जप्त केलेल्या दुचाकी असल्याचे सांगून विक्री
आरोपी आश्पाक पठाण याला स्प्लेंडर मोटारसायकल विशेष आवडत असल्याने तो प्रामुख्याने त्याच कंपनीच्या गाड्या चोरी करत असे. पाथर्डी येथून बसने पुण्यात येऊन तो विविध भागांतून दुचाकी चोरी करत असे. चोरी केलेल्या काही गाड्या तो एका ठिकाणी जमा करून ठेवत असे. त्यानंतर त्या दुचाकी फायनान्स कंपनीने हप्ते न भरल्यामुळे जप्त केलेल्या असल्याचे सांगून ओळखीच्या व्यक्तींना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.