Pimpri Akshaya Tritiya Market Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Akshaya Tritiya Mango Price Rise: अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी बाजारात फुलली गर्दी; हापूसचे दर गगनाला

पूजा साहित्य आणि आंब्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; कमी उत्पादनामुळे हापूसच्या दरात दुपटीने वाढ

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीया सणानिमित्त बाजारपेठ पूजा साहित्यांनी फुलून गेली होती. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते. त्यासाठी लागणारे मातीचे घट, पत्रावळी, द्रोण, आंबे घेण्यास नागरिकांची गर्दी झाली होती.

पिंपरी आणि चिंचवड येथील बाजारपेठेत अक्षयतृतीयेनिमित्त लाल आणि काळे घट विक्रीस उपलब्ध होते. छोटे घट 30 आणि मोठा घट 70 रुपयांना विक्री केला जात होता. प्रथेप्रमाणे मातीचे घट आणून पाणी भरून त्यात वाळा टाकतात. पत्रावळी, द्रोण, आंब्याचे पन्हे, पापड, कुरड्या पत्रावळीत वाढल्या जातात. यासाठी पत्रावळी, द्रोणदेखील विक्रीस उपलब्ध होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नैवेद्यासाठी लागणारे आंबे खरेदीला गर्दी झाली होती. बाजारात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला आंबे विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

आंब्याचे भाव वाढलेलेच

आंब्याची आवक कमी प्रमाणात असल्याने दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक डझन हापूसचे दर 800 ते 1200 रुपयांपर्यंत आहेत. तर किरकोळ बाजारात एक डझन हापूसची विक्री 1200 ते 1500 रुपये आहे. अक्षयतृतीयेला पूर्वजांना आंब्याच्या रसाचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.

त्यामुळे दरवर्षी अक्षयतृतीयेच्या आधी आंब्याच्या मागणीत वाढ होते. यंदा मात्र, हवामान बदलामुळे आंब्याचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात आहे. परिणामी बाजारात मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाली आहे. विशेषत: हापूसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हापूसच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. बाजारात कच्च्या हापूसची आवक वाढली आहे.

मात्र, ग्राहकांकडून तयार हापूसची मागणी असते. हापूस तयार होण्यास वेळ लागतो. यंदा आंबा उत्पादनाला बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला आहे. तापमानातील चढ-उतार, दमट वातावरण तसेच प्रादुर्भावामुळे यंदा मोहर टिकला नाही. गेल्या वर्षी अक्षयतृतीयेला हापूसचे दर 600 ते 1000 रुपयांपर्यंत होते. यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT