Pimpri Traffic Jam Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Traffic Jam: पिंपळे निलख-भोसरी बीआरटी मार्गावर वाहतूक कोंडीचा कहर

अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या कारवाईची मागणी वाढली

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे निलख: पिंपळे सौदागर ते भोसरी बीआरटी मार्ग हा आधीपासूनच वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाणारा रस्ता आहे. आयटी हब हिंजवडीकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर सध्या परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहने निर्बंधित वेळेत रस्त्यावरून प्रवास करत असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या मार्गावर अनेक ठिकाणी सिग्नल नादुरुस्त असून, वाहतूक नियंत्रण पूर्णपणे ढासळलेले दिसते. दुचाकीस्वार, पादचारी मार्गावरून बेधडक वाहन चालवत आहेत, तर अवजड वाहनांनी अक्षरशः रस्त्यावर ताबा मिळविला आहे. शालेय वेळेत बंदी असतानाही ट्रॅव्हल्स, वॉल्वो बसेस, मिक्सर, डंपर यांची वर्दळ सुरूच आहे. यात भर म्हणजे मोठ्या ट्रॅव्हल्स रस्त्यातच थांबून प्रवासी घेत असल्यामुळे सिग्नलजवळ रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी निर्माण होते.

त्यामुळे मागे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, वाहतूक पोलिस प्रत्यक्ष ठिकाणी असतानाही नियंत्रणाऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम धाब्यावर बसवणारे वाहनचालक, अपुरी यंत्रणा आणि अंमलबजावणीतला ढिलाई यामुळे पिंपळे सौदागर-भोसरी मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. आता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर ही समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

कधी येणार शहाणपण?

पिंपरी-चिंचवड शहर व उपनगरांत अवजड वाहनांमुळे अपघात होऊन अनेक दुचाकीचालकांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील वाहतूक विभागाकडून शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर अवजड वाहनांना सकाळी व सायंकाळी बंदी असताना रहदारीच्या मार्गावर अवजड वाहने सर्रास वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वाहतूक प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न नागरिक करत आहेत.

ट्रॅव्हल्स संघटनांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनांवर थेट कारवाई करण्यास शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र, ज्या गाड्या चौकात थांबतात किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवासी घेतात, त्यांच्यावर आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. दररोज सुमारे 7 ते 8 वाहनांवर कारवाई केली जाते. शहरात प्रवेशाबाबत स्थगिती असली तरी नियमभंग करणाऱ्या वाहनांवर रस्त्यात थांबल्यानंतर निश्चितच कारवाई केली जाते आणि ही मोहीम पुढेही सुरू राहील. नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
सुदाम पाचोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, सांगवी
दररोज या रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शाळेच्या वेळेत मुलांना सोडताना आणि आणताना तर परिस्थिती अधिकच गंभीर होते. जड वाहने, रस्त्यात थांबलेल्या ट्रॅव्हल्स आणि बंद सिग्नलमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्रशासनाने फक्त आश्वासन न देता प्रत्यक्षात कडक कारवाई करावी.
भावना गवळी, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT