Pimpri Illegal flex banners Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal flex banners: स्मार्ट सिटीच्या खांबांना जाहिरात फलकांचा विळखा; सुशोभीकरणाचे तीन तेरा

पिंपळे गुरवमध्ये दिव्यांची चोरी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: नागरिकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि शहराचा चेहरामोहरा बदलावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.

मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्मार्ट सुविधांना आता अनधिकृत जाहिरातींचा विळखा पडला आहे. पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीशेजारील सुंदर पदपथावरील 'स्मार्ट खांब' सध्या खासगी फ्लेक्सबाजीचे केंद्र बनले असून, महापालिकेच्या सुशोभीकरणाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पिंपळे गुरव परिसरातील पदपथांचे सुशोभीकरण करून तेथे आकर्षक डिझाइनचे विद्युत दिवे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज 'स्मार्ट पोल' उभारण्यात आले. परंतु, सद्यस्थितीत यातील काही 'स्मार्ट पोल'वरील दिवेच गायब झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

विशेष म्हणजे, स्मार्ट सिटीच्या खांबांवर इमारतींच्या जाहिरातींचे मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यासोबतच सेल्स ऑफिसचे फलकही याच खांबांवर लटकवण्यात आले आहेत. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या परिसराचा वापर आता केवळ खासगी व्यावसायिक जाहिरातींसाठी करत असल्याने पदपथाचे पूर्णपणे विद्रूपीकरण झाले आहे.

करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी

पिंपळे गुरव परिसराची शोभा वाढविण्यासाठी नागरिकांच्या कररूपातील लाखो रुपयांचा निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आला. मात्र, आज याच ठिकाणी विद्युत दिव्यांची दुरवस्था आणि खांबांवर चोहोबाजूला लटकणारे बेकायदेशीर फ्लेक्स पाहून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली उभारलेल्या या सुविधा खासगी बिल्डर्स आणि सेल्स ऑफिसच्या जाहिरातींसाठी आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नागरिकांकडून कारवाईची मागणी

परिसराचे सौंदर्य पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून खांबांवरील इमारतींच्या जाहिरातींचे विद्रूप फ्लेक्स व सेल्स ऑफिसचे फलक त्वरित हटवावेत. तसेच गायब झालेले दिवे नवीन बसवून, पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून संबंधित जाहिरातदारांवर कठोर कायदेशीर उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी पिंपळे गुरव येथील नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे शहराच्या सौंदर्यीकरणाचा डांगोरा पिटणारे महापालिका व स्मार्ट सिटी प्रशासन दुसरीकडे या उघड्या डोळ्यांनी चाललेल्या प्रकाराकडे पूर्णपणे काणाडोळा करत आहे. गायब झालेल्या दिव्यांची देखभाल करणे आणि खांबांवर लावलेले अनधिकृत फ्लेक्स हटवणे, यावर संबंधित विभागाचे काही नियंत्रण आहे की नाही, असा थेट प्रश्न स्थानिक रहिवासी विचारत आहेत.

स्मार्ट पोलवरील दिव्यांची चोरी वाढली आहे. पोलच्या शेजारी सध्या साधे ब्रॅकेट लावले आहेत. त्यांचे अधिक मजबूत पद्धतीने फिक्सेशन करण्याचे नियोजन असून, त्यासाठी बजेटमध्ये प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. दिव्यांची चोरी होऊ नये, यासाठी महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- दीपाली धेडे, उपअभियंता विद्युत, रहाटणी, ड क्षेत्रीय कार्यालय पिंपरी चिंचवड.
कल्पतरू परिसरातील स्मार्ट सिटीच्या विद्युत पोलवर लावण्यात आलेले जाहिरातींचे फ्लेक्स तातडीने काढून घेण्यात येतील. याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
- अश्विनी गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी, ड क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT