पिंपरी: पिंपळे गुरवहून कासारवाडी तसेच महामार्गाकडे जाणाऱ्या नदीकाठच्या रस्त्यावर अज्ञात वाहनांतून राडारोडा व चिखल सांडल्याने रस्ता निसरडा झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या रिमझिम पावसानंतर रस्त्यावर झालेेल्या चिखलामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. यामुळे तब्बल १३ ते १४ दुचाकी व इतर वाहनांचे किरकोळ अपघात झाले होते.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व राडारोडा पडलेला असतानाही संबंधित वाहनचालकाने तो साफ न करता घटनास्थळावरून वाहन घेऊन गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंपळे गुरव-कासारवाडी मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसाठी हा चिखलाचा पट्टा अक्षरशः धोकादायक सापळा ठरत आहे. अनेक दुचाकी घसरून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले असून काही नागरिकांच्या हातापायांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
विशेषतः सकाळच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असताना रस्ता ओलसर झाल्याने चिखल अधिक निसरडा झाला आहे. त्यातच रस्त्यावर पडलेला राडारोडा व चिखल वेळेत हटविण्यात न आल्याने एकामागोमाग एक वाहन घसरल्याचे दिसून आले. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत वाहने नियंत्रित केली. मात्र, काही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले.
अपघाताची भीती
पिंपळे गुरवकडून कासारवाडी, पिंपरी तसेच पिंपरी-मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गाच्या दिशेने जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच, क्षत्रिय ह कार्यालयाकडेच जाणारा मार्ग असून, हाताच्या अंतरावर कार्यालय असूनही याची दखल का घेतली जात नाही. रस्त्यावर चिखल व राडारोडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महापालिका विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून चिखल हटवावा आणि रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्यावर चिखलाचा अंदाजच आला नाही. दुचाकी अचानक घसरली आणि मी पडलो. हाताला दुखापत झाली आहे. येथून पालिकेचे ह क्षेत्रीय कार्यालय हाताच्या अंतरावर असूनही याकडे दुर्लक्ष का? हा चिखल तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करावा, नाही तर आणखी मोठा अपघात होऊ शकतो, असे अपघातग्रस्त दुचाकीस्वार लतिफ सय्यद याने सांगितले.