पिंपळे गुरव: कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या कचरा संकलन केंद्रालगत नाल्याच्याकडेला खुलेआम मोठ्या प्रमाणावर कचरा जाळला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कचरा जाळल्याने निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
परिसरातील नागरिक त्रस्त
या आगीमधून निघणारा धूर परिसरातील नागरिकांसह स्टेशनकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कासारवाडीतील रहिवासी हवेच्या बिघडत चाललेल्या गुणवत्तेमुळे त्रस्त झाले असून, त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळाच्या अगदी शेजारी महापालिकेचे कचरा संकलन केंद्र अस्तित्वात असतानादेखील कचरा जाळण्याचा प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
जळणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिक कागद, सुके गवत तसेच इतर घातक घटकांचा समावेश असून, त्यातून निघणारा विषारी धूर हवेत मिसळून प्रदूषण अधिकच तीव्र करत आहे. परिणामी नागरिकांना श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ होत आहे. वाहतूक आणि प्रवाशांची सतत वर्दळ असलेल्या या परिसरात धुरामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहर वाढत्या प्रदूषण पातळीशी झुंज देत असताना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने राबवलेले उपक्रम प्रत्यक्षात निष्फळ ठरत असल्याचेच चित्र दिसत आहे.
कचरा जाळण्याच्या प्रक्रियेदरम्यान हवेत सोडला जाणारा विषारी वायू कर्करोग, यकृताचे आजार, दमा, श्वसनातील अडथळे तसेच मेंदूशी संबंधित गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. असे असतानाही शहरातील विविध भागांत कचरा जाळण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य उपनियम 2006 नुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे किंवा कचरा जाळणे हा दंडनीय गुन्हा आहे. सार्वजनिक जागेवर कचरा जाळण्यावर कायद्याने पूर्णतः बंदी असतानाही हे प्रकार रोखण्यात प्रशासन अपयशी का ठरत आहे? असा थेट सवाल आता संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
संबंधितांवर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असून, नियंत्रण व्यवस्था केवळ कागदावरच असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पर्यावरण संरक्षणाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या यंत्रणांना कासारवाडीतील हा धुराळा वास्तवाचा आरसा दाखवत आहे. त्यामुळे तात्काळ कठोर कारवाई न केल्यास हा प्रश्न भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करेल अशी भीती व्यक्त होत आहे. कचरा जाळणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, तसेच याकडे दुर्लक्ष करणार्ऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कचरा जाळणाऱ्या ठिकाणी तपासणीसाठी टीम पाठवली जाईल. कचरा जाळणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.योगेश आल्हाट, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
कचरा जळत असलेल्या ठिकाणाची पाहणी केली जाईल. त्या ठिकाणावरील कचरा तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले जातील. तसेच, जे कोणी कचरा जाळताना आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.अंकुश झिटे, सहायक आरोग्य अधिकारी, ह क्षेत्रीय कार्यालय
कचरा जाळण्यास कायद्याने बंदी आहे, तरी हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. शेजारीच कचरा संकलन केंद्र असताना कचरा जाळायची गरज तरी काय? हे प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, याची चौकशी करावी.तुषार माने, स्थानिक नागरिक