पिंपळे गुरव: कासारवाडी येथील नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी शेजारी विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाण्याच्या टाकीची दुरवस्था सध्या नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे. गणेशोत्सव काळात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्लास्टिकच्या कृत्रिम पाण्याच्या टाकीमध्ये मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र विसर्जनानंतर तब्बल दोन ते तीन महिने उलटून गेले तरी दोन्ही टाकीतील नारळ, हार, फुले, पूजेचे साहित्य व इतर कचरा अद्यापही साफ करण्यात आलेला नाही.
सदर टाकीमध्ये साचलेला कचरा अक्षरशः सडलेल्या अवस्थेत असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डास, माश्या व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही टाकी स्मशानभूमीच्या अगदी शेजारी असल्याने मयत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कुंदननगर, कासारवाडी तसेच परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी या स्मशानभूमीत मोठ्या संख्येने येत असतात. अशा संवेदनशील ठिकाणी सडलेला कचरा, दुर्गंधी व अस्वच्छता आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दुःखद प्रसंगी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना या दुर्गंधीयुक्त वातावरणाला सामोरे जावे लागणे ही प्रशासनाची उदासीनता दर्शवते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणापासून अवघ्या थोड्याच अंतरावर आरोग्य विभागाचे मुख्य कार्यालय आहे. असे असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून कृत्रिम टाकीमध्ये कचरा सडलेल्या अवस्थेत असूनही तो आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास कसा येत नाही, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या समस्येकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही होत आहे.
प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांत नाराजी
नागरिकांनी संबंधित महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून सदर कृत्रिम पाण्याची टाकी साफ करावी, सडलेला कचरा त्वरित हटवावा व भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा रोगराई पसरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
सदर ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे. फायबरच्या पाण्याच्या टाकीमध्ये एक दोन नारळ पडलेले आढळून आले असून, ते नागरिकांनी नंतर टाकल्याचे दिसून येते. सदर टाकी फायबरची असून, पर्यावरण विभागाकडून ती अद्याप उचलून नेण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच सदर टाकी हटवून परिसराची संपूर्ण साफसफाई करण्यात येईल.उद्धव डवरी, मुख्य आरोग्य निरीक्षक, ह क्षेत्रीय कार्यालय
गणपती विसर्जनानंतर तीन महिने उलटून गेले तरी टाकी साफ केली नाही. नारळ, हार सडून प्रचंड दुर्गंधी येत आहे. आरोग्य विभागाचे कार्यालय जवळ असूनही तीन महिने कुणालाच हे दिसत नाही. हे आश्चर्यकारक आहे.स्थानिक नागरिक