Pimple Gurav Wall Collapse Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav Wall Collapse: पिंपळे गुरवमध्ये जीर्ण संरक्षक भिंत कोसळली; अरुंद बोळीत दगड-मातीचा ढिगारा, दुर्घटनेचा धोका

अहिल्यादेवी होळकर मैदानालगत नागरिकांची जीव मुठीत धरून ये-जा; दीड महिन्यापासून भिंत धोकादायक अवस्थेत

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: संत तुकारामनगर येथील अहिल्यादेवी होळकर मैदानाची जीर्ण झालेली संरक्षक भिंत खचून मोठा भाग कोसळला आहे. भिंत कोसळल्याने दगड-मातीचा मोठा ढिगारा अरुंद बोळीत पडला असून, म्हाडा वसाहतीतील नागरिकांना याच अरुंद मार्गातून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

मैदानालगत म्हाडाची वसाहत असून, येथील नागरिकांसाठी हा अरुंद बोळ ये-जा करण्याचा प्रमुख मार्ग आहे. मात्र, भिंतीचा भाग कोसळून रस्त्यावर दगड-मातीचा ढिगारा आल्याने मार्ग आणखी अरुंद झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना ढिगारा चुकवत कसरत करून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यास दगडांवरून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भिंतीचा उर्वरित भागही जीर्ण अवस्थेत असल्याने तो कधीही कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का?

भिंतीची दुरवस्था आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

महापालिका प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, रस्त्यावरील दगड-मातीचा ढिगारा हटवावा आणि धोकादायक भिंतीचा उर्वरित भाग सुरक्षित करावा. तसेच, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता संरक्षक भिंतीची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांचा मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी संत तुकारामनगरातील रहिवाशांकडून होत आहे.

गेल्या दीड महिन्यापासून ही भिंत पडलेली आहे. भिंतीच्या उर्वरित भागालाही तडे गेले आहेत. सततच्या पावसामुळे हा भाग आणखीन कोसळण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने तातडीने पाहणी करून भिंतीची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
राजेश पोखरकर, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT