पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकार्यांवर राजकीय दबाव आणि हस्तक्षेप किती वाढला आहे, याचे धक्कादायक उदाहरण गुरुवारी (दि.24) समोर आले. एका आमदाराच्या स्वीय सहाय्यक (पीए) महाशयांनी विविध कामे वेळेत मार्गी लावण्यावरून पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या दालनात साहेब, नुसते चॉकलेट नका देऊ, मला शुगर आहे, असा धमकीवजा इशारा दिला. त्यावरून महापालिकेत स्वीय सहाय्यकांचा कसा रुबाब आहे, हे दिसून आले.
एका आमदाराचे स्वीय सहाय्यक हे गुरुवार (दि.24) महापालिका भवनात आले होते. त्यांनी एका वरिष्ठ अधिकार्यांची त्यांच्या केबिनमध्ये भेट घेतली. या वेळी त्या महाशयांनी पालिकेतील कर्मचार्यांच्या बदल्या आणि इतर काही प्रशासकीय कामांची यादी संबंधित अधिकार्यांसमोर ठेवली. या सर्व कामांवर अधिकार्याने सकारात्मक प्रतिसाद देत, ती कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली; तसेच तुमचे काम होऊन जाईल, असे उत्तर दिले. (Latest Pimpri News)
बैठक संपवून स्वीय सहाय्यक जायला निघाले असता, त्यांनी जाता-जाता अधिकार्यांना उद्देशून एक सूचक विधान केले. साहेब, तुम्ही सगळ्याच कामांना हो म्हणत आहात, हे चांगले आहे. नुसते चॉकलेट नका देऊ, मला शुगर आहे, असेही सुनावले. या वाक्याचा वरकरणी अर्थ साधा वाटत असला तरी, केवळ तोंडी आश्वासने देऊ नका, प्रत्यक्ष कामे करा, अन्यथा परिणाम वेगळे होतील’, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला.
या घटनेमुळे महापालिका प्रशासनावर राजकीय व्यक्तींचा दबाव किती वाढला आहे, हे स्पष्ट होते. बदल्या, ठेके आणि अन्य आर्थिक हितसंबंधांच्या कामांसाठी प्रशासकीय अधिकार्यांवर कशाप्रकारे दबाव टाकला जातो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. ही घटना महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.
आमदारांच्या ‘पीएं’ची महापालिकेत वर्दळ
महापालिका भवनात आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणत्याही अधिकार्याच्या केबिनमध्ये ते बिनधास्तपणे घुसतात. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या फाईली तसेच, कागदपत्रेही ते स्वत:च घेऊन वावरत असतात. टेबल टू टेबल सह्या घेऊन अखेरच्या मान्यतेपर्यंत स्वीय सहाय्यक पाठपुरावा करतात.
शहरात भाजपचे चार तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. या आमदारांचे प्रत्येकी एक ते चार स्वीय सहाय्यक दररोज महापालिका भवनात दिसून येतात. प्रशासकीय राजवट असल्याने माजी नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकांपेक्षा आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची संख्या महापालिकेत अधिक झाली आहे. काही वरिष्ठ अधिकार्यांच्या अॅण्टी चेंबरमध्ये ठराविक स्वीय सहाय्यकांची बैठकही घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तू घाबरू नकोस, तुझी बदली कोण करू शकत नाही
महापालिकेतील एक लिफ्टमनवर एका आमदाराची खास मर्जी आहे. वायसीएम रुग्णालयात झालेली त्याची बदली रद्द करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले होते. इतक्या छोट्या गोष्टीसाठी वरपर्यंत जाण्याची गरज काय, असा सवाल आयुक्तांनी त्या आमदारांना केला होता. तरीही हट्ट करीत त्या लिफ्टमनला पालिकेतील मुख्य लिफ्टवर नेमण्यात आले. आता, तुझी बदली कोणी करू शकणार नाही. आयुक्त आणि संबंधित अधिकार्यांना मी दम भरला आहे, असे त्या स्वीय सहाय्यकाने लिफ्टमनला सांगितल्यानंतर त्याने आभार मानले. पालिकेत स्वीय सहाय्यकाचा असलेला दबदबा या घटनेवरून समोर आला आहे.