पिंपरी: पुणे जिल्ह्यामध्ये नवी रेशन दुकाने सुरू करण्यासाठी जिल्हा अन्न पुरवठा विभागाकडून अर्ज मागविण्यात आले होते; मात्र अर्ज येऊनही त्याबाबत प्रक्रिया झालेली नाही. शहरात सात ठिकाणी नव्याने स्वस्त धान्य दुकानांसाठी 20 हून अधिक अर्ज आले आहेत; परंतु शासकीय अनास्थेमुळे परवाना प्रक्रिया रखडलेली आहे. परिणामी शहरातील लाभार्थ्यांना धान्य मिळविण्यासाठी दूरच्या दुकानांत पायपीट करावी लागते.
शहरात तीन लाख 38 हजार 640 शिधापत्रिकाधारकांमागे केवळ 247 दुकानदार आहेत. नव्याने केलेल्या अर्जामध्ये अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने ती प्रक्रिया प्रलंबित आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, भोसरी आणि निगडी येथील अन्नपुरवठा परिमंडल कार्यालयांतर्गत रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत धान्याचे वाटप केले जाते. (Latest Ahilyanagar News)
वार्षिक उत्पन्न 21 हजार रुपयांच्या आत असणार्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामध्ये एका शिधापत्रिकेवर 10 किलो गहू दोन रुपये दराने; तर 15 किलो तांदूळ तीन रुपये दराने प्राप्त होतो.
वार्षिक 59 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणारर्याचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होतो. त्यामधील लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील समाविष्ट प्रत्येक व्यक्तीमागे दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळतो. तर 59 हजार रुपयांच्यावर वार्षिक उत्पन्न असणार्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप बंद झाले आहे.
दुकानदारांच्या समस्या
तुटपुंजे कमिशन, शिधापत्रिकाधारकांची घटती संख्या, दुकानाचे भाडे, वीजबिल, धान्य वाटपातील तांत्रिक बदल आणि शासनाचे होणारे दुर्लक्ष आदी समस्यांनी शहरातील रास्त भाव धान्य (रेशन) दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. दुकान चालविण्यासाठी खिशातील पैसे घालण्याची वेळ येत असल्याच्या तक्रार दुकानदार करत आहेत. अनेकजण दुकाने बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत. तर नव्या दुकानांसाठी अर्ज करूनही प्रक्रिया प्रलंबितआहे. त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
नवीन दुकानांना अर्ज, प्रकिया शून्य
शहरातील तीनही कार्यालयांतर्गत केवळ 247 धान्य दुकानदार आहेत. पाच वर्षांपूर्वी ही संख्या 450 एवढी असल्याची माहिती संघटनांचे पदाधिकारी दिली. नव्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्याने 13 ठिकाणी दुकानासाठी अर्ज मागवले होते. त्यात ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक, काळाखडक, रहाटणी , पिंपळे निलख गावठाण, शितोळेनगर आणि ‘ज’ विभागांतर्गत वैभव नगर, तपोवन मंदिर रोड, गणेशनगर दापोडी, जय शंकर मार्केट चिंचवड स्टेशन यांचा समावेश आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांच्या व्यथा
दुकानदारांना एका किलोमागे दीड रुपये एवढे तुटपुंजे कमिशन मिळते, ते अपुरे आहे. त्यातच शहरातील एक लाख 75 हजार शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप बंद झाले आहे. संख्या घटल्याने शहरातील धान्य दुकानदारांना मिळणारा नफादेखील घटला आहे. कमिशनदेखील कमी असल्याने तोटा सहन करावा लागतो.
शिधापत्रिका धारकांची संख्या
चिंचवड 1 लाख 22 हजार 697
भोसरी 1 लाख 5 हजार 936
निगडी 1 लाख 10 हजार 25
रहाटणी परिसरात जवळ धान्य मिळत नसल्याने पिंपरीत धान्य घ्यावे लागते. त्यासाठी पायपीट करावी लागते. या परिसरात दुकान झाल्यास त्याचा फायदा होईल.सुनिता पवार, टपरीचालक, काळेवाडी