.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C3%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
चाकण: वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चाकण परिसरात अतिक्रमणे काढून तातडीने तेथील रस्त्यांची कामे करा. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली. (Latest Pimpri News)
त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ’पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी चाकण व एमआयडीसी परिसरातील भारतमाता चौक, समृद्धी पेट्रोल पंप, सॅनी कंपनी (नाणेकरवाडी), बंगलावस्ती (मेदनकरवाडी), सासे फाटा, चाकण चौक, आंबेठाण चौक, कडाचीवाडी, खराबवाडी, महाळुंगे पोलिस ठाणे, एमआयडीसी रस्ता आदी भागांची पाहणी केली.
या वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, रस्ते विकास व रुंदीकरणाबाबत अधिकार्यांशी चर्चा केली. चाकण व परिसरात अवजड वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडी कायम असते.
त्यामुळे अशा वाहनांसाठी ठराविक वेळेची बंधने घालणे, एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करणे, तसेच आरटीओ व पोलिस यंत्रणांनी संयुक्त नियोजन करणे आवश्यक असल्याचे पवार यांनी सांगितले. कचर्याची समस्या निकाली काढणे, अतिक्रमण तातडीने हटवणे, रस्ते विकसित करताना अडथळा आणणार्यांवर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
बैठकीत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. म्हसे यांनी वाहतूक कोंडी निवारणासाठी कालबद्ध टप्प्यांनुसार उपाययोजना व मास्टर प्लॅन सादर केला. यामुळे लवकरच महामार्ग व औद्योगिक भागातील अतिक्रमणे निष्कासित होणार असल्याचे स्पष्ट झाले.