PCMC Zero Waste Pudhari
पिंपरी चिंचवड

PCMC Zero Waste: पिंपरी-चिंचवडमध्ये झिरो वेस्ट उपक्रमाला प्रतिसाद; 11.47 टन कचऱ्याचे विलगीकरण

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झिरो वेस्ट संकलन उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून महिनाभरात 11.47 टन कचऱ्याचे ओला, सुका आणि सॅनिटरी प्रकारात विलगीकरण करण्यात आले आहे

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शून्य कचरा (झिरो वेस्ट) संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिनाभरात ११. ४७ टन कचर्‍याचे विलगीकरण करण्यात आले आहे. या उपक्रमात १९ हजार ८०५ घरांनी सहभाग नोंदविला आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, महिनाभरात कालावधीत ९.९७ टन ओला कचरा आणि १. ५० टन सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यात आला. याशिवाय, ६४३ किलो सॅनिटरी कचर्‍याचे सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले. कचर्‍याच्या वर्गीकरणामुळे पुनर्वापर व पुनर्निर्मिती प्रक्रियेला गती मिळत असून, पर्यावरणीय परिणाम कमी करण्यास मदत होत आहे.

कचरा डेपोवरील वाढता ताण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी महापालिकेकडून शून्य कचरा संकल्पना राबविण्यात येत आहे. घराघरांत ओला, सुका, सॅनिटरी व विशेष काळजीयोग्य कचरा वेगळा करण्याची सवय वाढत असल्याने कचर्‍याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाला बळ मिळत आहे.

आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, कचर्‍याचे योग्य प्रकारे विलगीकरण केल्यास त्याचा पुनर्वापर, पुनर्निर्मिती व सुरक्षित विल्हेवाट लावणे अधिक सुलभ होते. ओला कचरा कंपोस्ट निर्मितीसाठी, तर सुका कचरा पुनर्वापरासाठी उपयुक्त ठरतो.

नागरिकांनी ओला, सुका कचरा वेगळा करावा

शहर स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी व घातक कचरा अशा चार प्रकारांत कचरा विलगीकरणाची सवय कायम ठेवावी. नागरिकांचा वाढता सहभाग ही या उपक्रमाची जमेची बाजू ठरत असून, माझा कचरा, माझी जबाबदारी ही संकल्पना अधिक बळकट होत आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT